सिडको प्रकल्पग्रस्तांचे सिडकोने मागील ४३ वर्षांत पुनर्वसन,गावठाण विस्तार,सिडको साडेबारा टक्के,गाव विकासाच्या योजना न राबविताच प्रकल्पग्रस्तांनी गरजेपाटी केलेल्या बांधकामांवर कारवाईचे सत्र अवलंबले आहे. मंगळवारी बोकडविरा ग्रामस्थांनी कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या अनाधिकृत बांधकाम विरोधी पथकाला परत पाठवित प्रथम ग्रामस्थांचे प्रलंबित समस्या सोडवा अशी मागणी सिडकोकडे करणारे निवेदन दिलेले आहे.
सिडकोच्या द्रोणागिरी नोड मध्ये मोडणाऱ्या बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत येथील प्रकल्पग्रस्तांनी राहती घरे तसेच व्यवसायीक बांधकामे केलेली आहे.अशा बांधकामांच्या जागेवर सिडकोने साडेबारा टक्केच्या भूखंडाचे वाटप केलेले आहे.त्यामुळे ही बांधकामे हटविण्यासाठी सिडकोच्या अनाधिकृत बांधकाम विरोधी पथकाच्या वतीने कारवाई करण्यासाठी मंगळवारी पथक आलेले होते.या पथकाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला.या दोन्ही प्रकारच्या बांधकामा संदर्भात राज्य सरकार व सिडको तसेच प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती यांच्या मध्ये चर्चा सुरू आहे.असे असतांना कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नसतांना प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे.या विरोधात बोकडविरा ग्रामपंचायतीने सिडकोच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन सिडकोने प्रथम आमचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली असल्याची माहीती बोकडविरा ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील यांनी दिली आहे.या निवेदनात बोकडविरा मधील प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करा,सिडकोच्या माध्यमातून येथील बेरोजगार तरूणांना रोजगार द्या,मागील अनेक वर्षांंपासून वाटप करण्याचे राहून गेलेल्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप करावे तसेच गावासाठी खेळाचे मैदान,नागरीसुविधा आदी मागण्या संदर्भात सिडकोने प्रथम चर्चा करावी अशीही मागणी करण्यात आलेली आहे.