टाईपराईटींग संस्थेचा तपासणी अहवाल विनात्रुटी वरिष्ठांकडे पाठविण्यास जि. प. शिक्षण विभागातील सहायक शिक्षण उपनिरीक्षक अर्जुन जाधवर यास ४५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील श्रीमंत नागरगोजे यांची पाटोदा येथे माऊली टाईपराईटींग संस्था आहे. गेल्या २२ नोव्हेंबरला उपशिक्षणाधिकारी रोटे व सहायक शिक्षण उपनिरीक्षक जाधवर यांनी तपासणी केली होती. तपासणीचा अहवाल त्रुटी न दर्शवता वरिष्ठांकडे पाठविण्यास जाधवर याने नागरगोजे यांच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीत नागरगोजे यांनी ४५ हजार रुपये देण्याचे मान्य केले व लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर व सहकाऱ्यांनी जाधवर यांच्या घराच्या परिसरात सापळा लावून लाचेची रक्कम घेताना जाधवर याला पकडले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.