जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५५७ वी जयंती २५ मे रोजी येथील त्रिरश्मी बुद्धलेणींच्या पायथ्याशी बुद्ध विहारमध्ये लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान व नालंदा ट्रस्ट यांच्या वतीने विविध उपक्रम, परिसंवाद, चर्चासत्र यांच्या माध्यमातून साजरी करण्यात येणार आहे. शनिवारी पहाटे पावणेसहा वाजता लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक ‘बुद्ध पहाट’ हा बुद्ध गीतांचा कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ व नालंदा ट्रस्टचे भन्ते धम्मदीप यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
बुद्ध पहाट या उपक्रमाची या वर्षी दशकपूर्ती असून १० वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ‘निळी पहाट’, धर्मातर घोषणा व वर्धापन दिनी ‘मुक्ती पहाट’ दर बुद्ध पौर्णिमेस ‘बुद्ध पहाट’ याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १४ ऑक्टोबर २०१३ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर ‘दीक्षा पहाट’ ही वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गझलांची मैफल लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथकाच्या वतीने सादर केली जाणार असल्याची माहिती शेजवळ यांनी दिली आहे. २५ मे रोजी होणाऱ्या बुद्धगीत गायन कार्यक्रमात सोमनाथ गयकवाड, दुष्यंत वाघ, विनायक पाटारे, रंगराज ढेंगळे, सुनील खरे, दत्ता पाईकराव, अनिल लेहनार, अशोकानंद गांगुर्डे यांचा सहभाग राहणार आहे.