दीड वर्षांपूर्वीच्या ऊसदर आंदोलनात शेतकऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन दिनकर पवार यांचा रविवारी मृत्यू झाल्यानंतर शिरोली पोलिसांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी ७९ जणांना अटक केली होती. आता याप्रकरणी खासदार शेट्टी यांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तर शेट्टी यांना पोलिसांनी अटक केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा महायुतीच्या वतीने देण्यात आला आहे.     
१२ नोव्हेंबर २०१२ रोजी ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलन करणारे शेतकरी व पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. आंदोलकांच्या हल्ल्यात मोहन पवार यांच्यासह चार पोलीस गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी शिरोली पोलिसांनी खासदार शेट्टी, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सावकार मादनाईक यांच्यासह ८४ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शिरोली पोलिसांनी ७९ जणांना अटक केली होती. पवार यांच्या मृत्यूनंतर हा गुन्हा आता खुनाचा प्रयत्न याऐवजी खून अशा स्वरूपात बदलण्यात आला आहे. त्यामुळे आरोपींवर खुनाच्या गुन्हय़ांतर्गत कारवाई करण्याबाबत रविवारी रात्री व सोमवारी सकाळी पोलिसांच्या हालचाली सुरू होत्या. पवार यांच्यावरील दीड वर्षांतील उपचार, या संदर्भातील विधिज्ञांचे मत व वैद्यकीय सूत्रांचे मत अजमावण्यात आले. त्यानंतर सोमवारी खासदार शेट्टी यांच्यासह ८४ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता सहायक पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.