महिला बचतगटांना केंद्र शासनाकडून ३० हजार रुपयांची सहायता मिळवून देतो, असे आमिष दाखवून बीड, जालना, परभणी या तीन जिल्हय़ांतील एकूण सत्तर महिला बचतगटांना ६६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या विलास नाईकवाडे यास पोलिसांनी अटक केली.
बीड येथील व्यंकटेश्वरा उद्योग समूहाने बचतगटांना आर्थिक साहाय्य पुरवण्याच्या नावावर बीड, जालना, परभणी या तीन जिल्हय़ांतील  १९०० महिलांना ६६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या या कंपनीचा सचिव विलास ज्ञानोबा नाईकवाडे यास पोलिसांनी अटक केली. व्यंकटेश्वरा उद्योग समूहाचे अध्यक्ष चेतन मनोहर पोकर्णा, सचिव अनिता श्रीमंत गायकवाड, कोषाध्यक्ष वर्षां विलास नाईकवाडे, श्रीमंत गायकवाड, अमित किरण नहार, अंबिका कल्याणकार, रंजित गायकवाड, अनघा चेतन पोकर्णा यांनी २००९ ते २०१२ या कालावधीत महिला व पुरुष बचतगटांना आमच्याकडे चार हजार रुपये भरून नोंदणी केल्यास केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये सहायता मिळेल, असे सांगून बचतगटांची फसवणूक केली. चार वर्षांत या संस्थेकडून काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळे शारदा सुदाम डोईजड यांनी १८ जानेवारी रोजी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विलास नाईकवाडे यांनी बनावट सहय़ा व खोटे कागदपत्र तयार करून महिलांना फसवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी विलास नाईकवाडे यास पोलिसांनी अटक केली.