nsk03यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक विभागीय केंद्र, चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया, विश्वास सहकारी बँक आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे १६ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत ‘सृजन’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भद्रकाली रस्त्यावरील विजयानंद चित्रपटगृहात सकाळी नऊ ते बारा या वेळेत हा महोत्सव होणार असून, त्यात पारितोषिक विजेते, मनोरंजनपर, प्रबोधनपर बालचित्रपट विनामूल्य सादर केले जाणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९ वाजता प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष विनायकदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता तसेच दिग्दर्शक सचिन शिंदे उपस्थित राहणार आहे. सोमवारी क्रांती कानडे दिग्दर्शित ‘महक मिर्झा’ हा हिंदी चित्रपट दाखविला जाईल. त्यात लहान मुलांचे भावविश्व, त्यांची स्वप्ने यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मंगळवारी अपूर्व किशोर बीर दिग्दर्शित ‘बाजा’ (माऊथ ऑर्गन) हा हिंदी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. शिबू एका खेडय़ात राहणारा साधा गरीब मुलगा आहे. त्याची विधवा आई त्याला मुंबईला काकांकडे शिकण्यासाठी पाठवते. मुंबई प्रवासात शिबूच्या जीवनात घडणाऱ्या घटना प्रौढांच्या व किशोरांच्या दुनियेतील दरी चित्रपटात स्पष्टपणे अधोरेखित करतात. बुधवारी अजय कार्तिक दिग्दर्शित ‘करामती कोट’ सादर केला जाईल. यामध्ये कचरा वेचणाऱ्या राजूला लाल रंगाचा जादूचा कोट मिळतो. त्या कोटात हात घातला की त्याला प्रत्येक वेळी एक रुपयाचे नाणे मिळते. या कोटामुळे राजू व त्याच्या मित्राची चैन होते. मात्र हा कोट चोरीला गेल्यानंतर पुढे काय.. असा प्रश्न उपस्थित करत कष्ट न करता मिळणारा पैसा फार काळ टिकत नाही, हा संदेश देण्यात आला आहे. १९ फेब्रुवारी रोजी अरुण खोपकर दिग्दर्शित ‘हाथी का अंडा’, शुक्रवारी श्रीधर रंगायन दिग्दर्शित ‘ये है यकूड बकूड बंब बो’ हा चित्रपट प्रसारित होणार असून, यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीतील गमती जमती, संघर्ष यावर भाष्य करण्यात आले आहे. शनिवारी जयश्री कनाल दिग्दर्शित ‘कट्ट कट्ट कडकट्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना चित्रपट माध्यमाची प्राथमिक ओळख व्हावी या उद्देशाने चित्रपटविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत सिडको येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे दिग्दर्शक सुधीर कुलकर्णी हे ‘सिनेमाची गोष्ट’ या विषयावर मार्गदर्शन करतील. २० तारखेला पेठ रोड येथील एकलव्य आदिवासी स्कूलमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत दिग्दर्शक व कॅमेरामन प्रवीण पगारे व चित्रपट समीक्षक रघुनाथ फडणीस यांच्या उपस्थितीत ‘सिनेमाचे तंत्र व छायाचित्रण’ या विषयावर कार्यशाळा होईल. २१ रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे पगारे यांची ‘सिनेमा कसा तयार होतो’ यावर कार्यशाळा होईल. बालचित्रपट महोत्सवासह कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव अ‍ॅड. विलास लोणारी, कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले आहे.ूर यांनी केले आहे.