पश्चिम बंगालमधील हजारो कोटींच्या शारदा चिटफंड घोटाळ्याप्रमाणेच या जिल्ह्य़ातही बोगस नावाने कंपनी सुरू करून चिटफंडचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. वेकोलि, वीज केंद्र, सिमेंट व खासगी उद्योगातील अधिकारी, कर्मचारी व मध्यमवर्गीयांनी यात कोटय़वधीची गुंतवणूक केली असून आता चिटफंड कंपनीने हात वर केल्याने हे गुंतवणूकदार पैसे मिळविण्यासाठी दारोदार भटकत असल्याचे चित्र येथेही बघायला मिळत आहे.
औद्योगिक विकासात आघाडीवर असलेल्या या जिल्ह्य़ात पश्चिम बंगालच्या धर्तीवर छोटय़ा-मोठय़ा चिटफंड कंपन्या गेल्या काही वषार्ंपासून सुरू आहेत. वेकोलि, वीज केंद्र, सिमेंट कंपन्या व खासगी उद्योगात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगला पगार असल्याचे हेरून काही चाणाक्ष लोकांनी दुर्गापूर, ऊर्जानगर, वेकोलि वसाहत, तुकूम, शास्त्रीनगर या परिसरात बोगस चिटफंड कंपन्या सुरू केल्या. या कंपनीत एक लाख रुपये जमा केले, तर दोन वर्षांत दुप्पट, त्यापेक्षा अधिक रक्कम भरली तर वष्रेभरात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष या कंपनीच्या विक्री प्रतिनिधींनी दिले. वष्रे दोन वर्षांत रक्कम दुप्पट मिळणार असल्याने वेकोलि, वीज केंद्र, सिमेंट व खासगी उद्योगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात कोटय़वधीची गुंतवणूक केली. लोकांनी ही गुंतवणूक करतांना संबंधित कंपनी अधिकृत की बोगस आहे, याची साधी शाहनिशा सुध्दा केली नाही. केवळ दुप्पट पैसे मिळतील, या लालसेपोटी लोकांनी यात गुंतवणूक केली. मात्र, अवघ्या काही वर्षांत या बोगस कंपन्या आर्थिकदृष्टय़ा उघडय़ा पडल्याने लोकांना आता पैशासाठी कंपनीच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे.
गडचांदूर येथून आलेल्या एका व्यक्तीने तुकूम येथे गुरूव्दाराजवळ अशाच प्रकारे कार्यालय थाटले. कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून या व्यक्तीने गुंतवणूकदारांना नागपूर, मुंबई व दिल्लीपर्यंतचा प्रवास घडवून आणला. या व्यक्तीने शहरातील लोकांकडून चिटफंडच्या नावावर कोटय़वधीची रक्कम गोळा केली. आता या व्यक्तीकडे गुंतवणूकदार मूळ रक्कम तरी परत द्या, असे म्हणून चकरा मारत आहेत. मनसेचा पदाधिकारी असलेल्या एका व्यक्तीनेही गुंतवणूकदारांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीनेही लोकांकडून कोटय़वधी रुपये गोळा केले. आता लोकांना दुप्पट व्याजदराने पैसे द्यायचे असल्याने ही व्यक्ती फरार झाली आहे. या व्यक्तीची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. परंतु, कुठलीही कारवाई झाली नाही. यवतमाळ येथून आलेल्या दीपक नावाच्या व्यक्तीने शहरातील सावकारांकडून अशाच प्रकारे पैसे गोळा केले. आता मात्र त्याच्याकडे मूळ रक्कम परत करण्याएवढेही पैसे नाहीत. त्यामुळे लोक या दीपकचा शोध घेत आहेत. केवळ एक दोन नाही, तर शहरात चांगले ३० ते ४० लोक चिटफंडचा व्यवसाय करून लोकांची फसवणूक करत आहेत. या माध्यमातून काहींनी भिशीचा प्रकार सुरू केला आहे. त्यातून आपला पैसा परत मिळू लागताच लोकांनी गुंतवणूक म्हणून या व्यवसायाकडे बघण्यास सुरुवात केली. आता या व्यवसायात लोकांनी पैसा गुंतवण्यास प्राधान्य दिले आहे.  या शहरात पाच ते सात ठिकाणी चिटफंडचे अशी कार्यालये सुरू आहेत. काही चिटफंड मोठे नाव वापरून आजही सुरू आहे, तर काही राजकीय आश्रय घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. बंगाली कॅम्प, दुर्गापूर, ऊर्जानगर, महाकाली परिसरात ही कार्यालये बघायला मिळतात. या संदर्भात काही लोकांनी दुर्गापूर व रामनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. परंतु, पोलिसांनी अजूनही कुठलीही कारवाई केलेली नाही. राजुरा, बल्लारपूर, सास्ती कॉलरी, भद्रावती, वरोरा, गडचांदूर या औद्योगिक पट्टय़ात हा व्यवसाय जोमात सुरू आहे. चिटफंड आर्थिक लुटीचे कारण बनले असतांना तक्रार प्राप्त झाल्या नाहीत, असे सांगत पोलीसही बंद डोळ्याने सर्व तमाशा बघत आहे. आता शारदा चिटफंडचा आर्थिक घोटाळा उघडकीस येताच लोकांचे डोळे उघडण्यास सुरुवात झाली असून चिटफंड कार्यालयात मूळ रक्कम तरी द्या, असे म्हणून गर्दी होत आहे. या व्यवसायात शहरातील खासगी सावकार सक्रीय आहेत. दुप्पट व्याजदराने पैसे देणारे सावकारांचे वर्तूळ चिटफंडचा व्यवसाय करत असल्याने येत्या काळात या शहरातही कोटय़वधीचा चिटफंड घोटाळा होणार आहे. ही वस्तुस्थिती असतांनाही लोक लाखोची गुंतवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.