रस्तालूट व दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना तपासासाठी घेऊन जात असताना, यातील तीन आरोपींनी सरकारी जीपचा पाठीमागील दरवाजा उघडून बेडय़ांसह पलायन केले. काल (सोमवारी) सायंकाळी नगर-मनमाड रस्त्यावर ही घटना घडली. पोलिसांनी आरडाओरड केल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नागरिकांनी पाठलाग करून या आरोपींना पकडून पोलिसांची अब्रू वाचवली.
रामनाथ ऊर्फ दादा गोरख मोरे (वय २०), चेतन दिलीप टाक (वय १९, दोघेही राहणार राहाता) व दीपक अंबादास पोकळे (वय १९, रा. लोहारे, ता. संगमनेर) हे तीन आरोपी नगर-मनमाड रस्त्यावर कोल्हार शिवारात नवाळे वस्तीनजीक सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास रस्तालूट व दरोडय़ाच्या उद्देशाने एकत्रित जमले असता, लोणी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना दुपारी न्यायालयासमोर उभे केले असता दि. ५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस नाईक किरण शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या तिघांना सरकारी जीपमधून तपासासाठी शिर्डी, साकुरी या ठिकाणी नेले असता तपास करून परत येताना आरोपींनी जीप रस्त्यांच्या खड्डय़ांमुळे हळू झाल्याचा फायदा घेत जीपचा पाठीमागील दरवाजा उघडून शेजारी बसलेल्या दोन पोलिसांना गाडीतून ढकलून देत बेडय़ांसह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलायन केले. त्यामुळे सहायक निरीक्षक देवीदास पवार व कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. रस्त्यावर पडल्याने दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी आरडाओरड केल्यामुळे जागरूक नागरिकांनी पाठलाग करून दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तिसऱ्या आरोपीला रात्री उशिरा पोलिसांना जेरबंद केले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची अब्रू वाचली.
लोणी पोलिसांनी राहाता शहरातून सहा-सात तरुणांना सोमवारी रात्री संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर काहींना सोडून दिले. तिघांना रस्तालुटीच्या गुन्ह्यात अटक केल्याची चर्चा आज दिवसभर होती. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी व अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. परंतु पोलिसांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. अन्य तरुणांना संशयावरून पकडून त्यांना वेगवेगळय़ा खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे काम लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत. तडजोडीनंतर ताब्यात घेतलेल्या लोकांना सोडून देण्यात येते. या कारभाराची अधीक्षकांनी चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोणी पोलीस ठाण्यातून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासही टाळाटाळ केली जाते.