कोल्हापूर शहर कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत नागरिकांनी कचरामुक्तीसाठी विविध प्रकारचे उपाययोजना सुचविताना लोकसहभाग देण्याचीही तयारी दर्शविली. बैठकीतील प्रतिसाद पाहता शहराऱ्यातील कचऱ्याची समस्या दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महापौर जयश्री सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. महापौर जयश्री सोनवणे यांनी याचे नियोजन करून या नवीन उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी शहरामध्ये कमीत कमी कचरा निर्माण व्हावा, या उद्देशाने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये नागरिकांची मते जाणून घेतली.
प्रारंभी प्रास्ताविकामध्ये उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी या उपक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली. महापौर जयश्री सोनवणे यांनी या वेळी बोलताना शहरातील कचऱ्याच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेबरोबरच शहरातील तज्ज्ञ व्यक्ती व नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
या वेळी प्रा.आर.डी.पाटील, आनंदा बाबुराव पोवार, किसन कल्याणकर, दीपक देवलापूरकर, उदय गायकवाड यांनी आपले मते व्यक्त केली.     
सुभाष नियोगी यांनी ऑडिओ व्हिज्युअल क्लिपद्वारे कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाची माहिती दिली. तर राजारामपुरी येथील युवक मित्रमंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या लाभांकुर या कचराकुंडीबाबत बाबा इंदूलकर यांनी माहिती दिली. ही कचराकुंडी महापौर जयश्री सोनवणे यांनी आपल्या निवासस्थानी ठेवण्यासाठी घेतली. महापौर सोनवणे यांनी सर्वाची मते जाणून घेतल्यानंतर या सर्व सूचनांचा विचार करून शहरासाठी भरीव कामगिरी करण्याचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सर्वाचे आभार मानले.
या वेळी उपायुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे, उपमहापौर सचिन खेडकर, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती प्रकाश कुंभार, प्राथमिक शिक्षक मंडळ समिती सभापती जयश्री साबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती शारदा देवणे, सभागृह नेता श्रीकांत बनछोडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. परवाना अधीक्षक विजय वणकुद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.