पावसाने काही दिवसांची रजा घेतली असली तरी पहिल्या टप्प्यात गारेगार झालेले शहर व त्यानंतर वाढलेला उन्हाचा कडाका यामुळे साथीच्या आजारांनी मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र प्रतिकारक्षमता पूर्णपणे कार्यरत न झाल्याने आणि नर्सरी- प्ले ग्रुपमध्ये भरपूर मित्र-मैत्रिणींशी संपर्कात आल्याने लहान मुलांना याचा जास्त फटका बसला आहे. ताप, खोकला, सर्दी यांनी हैराण झालेली लहानगी त्यांच्या आई-बाबांसोबत डॉक्टरकडे रांगा लावत आहेत.
हवेतील वाढलेले बाष्प आणि तापमान ही स्थिती विषाणूवाढीसाठी पोषक ठरते. त्यामुळे दर पावसाळ्यात विषाणूजन्य ताप आणि पोटदुखी यांची साथ पसरते. त्यातच पावसाळ्यात विषाणूवाहक असलेल्या डासांची संख्याही वाढत असल्याने त्यांच्यावाटे पसरणारे मलेरिया, डेंग्यू या आजारांचाही प्रभाव वाढतो. हे आजार लहान-मोठय़ा सर्वानाच होत असले तरी चार वर्षांखालील चिमुरडी मुले अधिक आजारी पडतात. सध्या ताप, सर्दी, खोकला यामुळे वर्गातील सुमारे वीस टक्के मुलांची उपस्थिती कमी झाली आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी मूल पूर्ण बरे झाल्याशिवाय पालक त्यांना शाळेत पाठवत नाहीत, असे मुंबई मुख्याध्यापक महासंघाचे सचिव आशीर्वाद लोखंडे यांनी सांगितले.
दोन-तीन वर्षांखालील मुलांची विषाणूंविरोधातील प्रतिकारक्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे विषाणूजन्य ताप त्यांना लगेच येतो. त्यातच या काळात प्ले ग्रुप, नर्सरी सुरू झाल्याने भरपूर मुलांशी संपर्क आल्याने ही साथ वेगाने पसरते. मात्र ताप आल्यावर त्या विषाणू विरोधातील प्रतिकारक्षमता शरीरात तयार होत जाते व मोठय़ा मुलांना फारसे आजार होत नाहीत, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार पवार यांनी सांगितले.
विषाणूजन्य तापासाठी भरपूर पाणी, आराम आणि लक्षणांवरील औषधे एवढे पुरेसे असते. मात्र काही आई-वडील अतिकाळजी करतात. औषधांनी ताप उतरल्यावर मूल हसत खेळत असेल तर काळजी करू नये. ताप लवकर जावा, यासाठी डॉक्टरांवर दडपण आणू नये, गरज नसताना प्रतिजैविके (अ‍ॅण्टिबायोटिक्स) दिली तर उपयोग तर होत नाहीच शिवाय दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. तापाचे प्रमाण खाली येत नसल्यास मात्र तपासणी करावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. गौतम सप्रे यांनी दिला. लहान मुलांना पावसात खेळू द्या, मात्र घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत. बाहेरचे उघडय़ावरचे, न शिजवलेले अन्न टाळावे. गढूळ पाणी तसेच दूषित अन्नातून अधिक त्रास होऊ शकतो, असेही ते म्हणाले.