दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेल्या असभ्यतेच्या मर्यादा ओलांडून केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सोलापूर शहर व जिल्हय़ात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले जात आहे. सोमवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने पार्क चौकात पवार यांचा पुतळा जाळण्यात आला. पवार यांनी माफी मागून भागणार नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. पवार यांनी सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकरी पाणी मागत असताना पवार यांनी त्यांना पाणी देण्याऐवजी त्यांची कुचेष्टा चालविल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
दुपारी शिवसैनिकांनी पार्क चौकात एकत्र येऊन अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नंतर त्यांचा पुतळा जाळण्यात आला. सेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्यासह महेश धाराशिवकर, सदाशिव येलुरे, सुनील शेळके  आदींचा या आंदोलनात प्रामुख्याने सहभाग होता. हे आंदोलन अचानक झाल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांनी अजित पवार यांच्या विरोधात यथेच्छ शिवराळ भाषेत नारेबाजी करीत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. नंतर पोलीस आले. तोपर्यंत आंदोलकांनी कार्यभाग उरकला होता.
काँग्रेसचे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील प्रणीत जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत व शहर व जिल्हय़ात आंदोलन केले. चार हुतात्मा पुतळय़ांजवळ जनसेवा संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित शिंदे, सत्तार शेख, शहर युवक अध्यक्ष निखिल सावंत, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष प्रशांत गायकवाड, सागर शितोळे, अजीम शेख, महेश रणदिवे आदी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अजित पवार यांच्या असभ्य विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला व त्यांचा पुतळा जाळला.
अजित पवार यांच्याविरोधात जनसेवा संघटनेसह शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप आदी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत ठिकठिकाणी आंदोलन केले. मोहोळ येथे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. तालुकाप्रमुख विक्रांत देशमुख, मनोज धनवे, गणेश गायकवाड, सुमित पवार, अलीम इनामदार, विनोद देशमुख आदी कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता.
अकलूज येथे माळशिरस तालुका जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा पुतळा जाळून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णा शिंदे, सरचिटणीस सुधीर रास्ते, चंद्रकांत शिंदे, धनाजी साखळकर, गणेश महाडिक, किरण गिरमे, सुजय गोडसे, नागेश लोंढे आदी कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता. तर पंढरपूर व कुर्डूवाडी येथही अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले.
पवारांच्या हकालपट्टीची मागणी
अजित पवार यांनी केलेल्या लांच्छनास्पद विधानाबद्दल अवघ्या महाराष्ट्राला शरम वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत सोलापुरातील माहिती अधिकार चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे स्थानिक संयोजक विद्याधर दोशी यांनी पवार यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. मागणीच्या निवेदनाची प्रत मेलद्वारे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पाठविण्यात आली आहे.