जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी २५ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम वर्ग केली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्य़ाचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी १२ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याची सूचना केली आहे
जिल्ह्य़ात २५ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान वाटपाचा आढावा जिल्ह्य़ाचे पालक सचिव तथा सहकार पणन व वस्त्रोद्योगचे सचिव राजगोपाल देवरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आदी उपस्थित होते.
गारपिटीमुळे जिल्ह्य़ात १२०७ गावांमध्ये नुकसान झाले. या आपत्तीत चौघांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दीड लाख रुपये याप्रमाणे सहा लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच पशुधनाच्या नुकसानीपोटी १२ लाख ५५ हजार ९५० रुपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. ज्या घरांची अंशत: आणि पूर्णत: पडझड झाली. त्यांना ५० लाख ७३ हजार ९५० रुपयांची मदत देण्यात आली आहे. पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना वाटपासाठी १४७.७२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडे २५ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. परंतु जिल्हा बँकांकडे जी रक्कम वर्ग झालेली आहे. त्यापैकी १० टक्के रक्कमच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली आहे. उर्वरित रक्कम पडून असल्यामुळे पालक सचिवांनी नाराजी व्यक्त केली.