लैंगिक छळवणूक आणि मानसिक छळ यांच्या अनेक तक्रारींबाबत नागपूर विद्यापीठाने दाखवलेला गांभीर्याचा अभाव आणि असंवेदनशीलता यांची कुलपती के. शंकरनारायण यांनी अखेर दखल घेतली आहे. महिला अधिव्याख्यात्या आणि विद्यार्थिनी यांच्याकडून मिळालेल्या सर्व तक्रारींबाबत कुलपतींनी कुलगुरू विलास सपकाळ  यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
अशा तक्रारींच्या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींना विद्यापीठ प्रशासन पाठीशी घालत असल्याचे लक्षात आल्यामुळे सिनेटचे माजी सदस्य धनंजय मंडलेकर यांनी कुलपती व राज्यपाल के. शंकरनारायण यांना पत्र पाठवून, कुलगुरू आणि विद्यापीठाचे इतर अधिकारी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याची परवानगी मागितली होती.
विद्यार्थ्यांचा छळ केल्याबाबत चौकशी समितीने दोषी ठरवूनही विद्यापीठाने शिक्षा न केलेल्या ज्येष्ठ शिक्षकांचे उदाहरणही त्यांनी नमूद केले होते.
आम्हाला मंडलेकर यांनी पाठवलेली तक्रार मिळाली असून त्यावर आम्ही विद्यापीठाला स्पष्टीकरण मागितले आहे.
आम्ही त्यांना या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, परंतु त्यासाठी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना कालमर्यादा घालून दिलेली नाही, असे कुलपतींचे सचिव विकास रस्तोगी यांनी सांगितले.
अशाच प्रकारच्या तक्रारी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाकडेही करण्यात आल्या असल्यामुळे याबाबत त्यांच्या निर्णयाचीही आम्ही वाट पाहात आहोत असे ते म्हणाले.
तथापि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलगुरूंनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या विचारणेवर सादर केलेल्या उत्तरात, विद्यार्थिनींचा छळ करण्याचा आरोप असलेल्या ज्येष्ठ शिक्षकाविरुद्ध घेतलेल्या सौम्य कारवाईचे समर्थन केले आहे.
  ज्या ज्येष्ठ शिक्षकांना चौकशी समितीने दोषी ठरवले आहे, त्यांना पाठीशी घालण्यासाठी चौकशीचा अहवाल दडपून ठेवल्याचा आरोप मंडलेकर यांनी त्यांच्या तक्रारीत कुलगुरूंवर केला आहे. महिलांची सुरक्षितता, संरक्षण व प्रतिष्ठा याबाबत कुलगुरू असंवेदनशीलता दाखवत असून, विद्यापीठात महिला सुरक्षित नाही असे त्यांनी म्हटले आहे.
यासाठी दोन उदाहरणे त्यांनी दिली आहेत. सावनेर येथील हरिभाऊ आदमने कला-वाणिज्य  महाविद्यालयातील एका महिला अधिव्याख्यातीने तिच्या प्राचार्याविरुद्ध केलेल्या लैंगिक छळणुकीच्या तक्रारीबाबत कुलगुरूंनी दीड वर्षांनंतरही कारवाई केलेली     नाही.
त्याचप्रमाणे पीएच.डी.च्या विद्यार्थिनींचा छळ  केल्याच्या प्रकरणात कुलगुरूंचे नामित सदस्य संजय खडक्कार यांच्या समितीने दोषी ठरवूनही विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख श्याम भोगा यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात कुलगुरू अपयशी ठरले आहेत.
विद्यापीठाच्या राजकारणात एका विशिष्ट गटाचे कुलगुरूंवर असलेले संपूर्ण नियंत्रण हे याचे कारण सांगितले जाते.