दुष्काळ निर्मूलनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यापेक्षा पाणी, चारा व मजूर माफियांना पोसण्यासाठीच दुष्काळाचा उपयोग केला जात असल्याची टीका भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी पारनेर येथे बोलताना केली.
पक्षाच्या तालुका कौन्सीलची बैठक पानसरे यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नारायणराव गायकवाड होते. जिल्हा सचिव सुभाष लांडे, तालुका सचिव संतोष खोडदे, बन्सी सातपुते, डॉ. सुधीर टोकेकर, बबनराव गंधाक्ते, जिल्हा परिषदेचे सदस्य आझाद ठुबे आदी यावेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षांपासून महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे, त्यास निसर्गापेक्षा शासनच जबाबदार असल्याचे सांगून पानसरे म्हणाले, जे सरकार जनतेला पिण्याचे पाणी देऊ शकत नाही त्यांनी विकासाच्या गप्पाच मारू नयेत. टँकर, चारा घोटाळे तसेच मजुरांचे पगार परस्पर लाटण्यासारखे अनेक प्रकार राज्यातील जनतेने अनुभवले असून सरकारसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कुकडी डावा कालवा तसेच पिंपळगाव जोगा धरणाचे पारनेर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळाल्यास व त्याचे नियोजनबद्घ वितरण केल्यास तालुक्यातील मोठय़ा भागातील दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मुलन होईल. उद्योगपतींसाठी पायघडया आंथरून सोई सवलती देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप पानसरे यांनी केला.
तालुक्यातील दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी निर्णायक संघर्ष उभा करण्या येणार असल्याचे आझाद ठुबे यांनी सांगितले. या बैठकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी, दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना, विदयार्थ्यांंना सर्व प्रकारची शुल्क माफी, मागेल त्याला नरेगाचे काम व वेळेवर पगार आदी मागण्या मांडण्यात आल्या, त्यासाठी येत्या दि. २१ ला तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला.