अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहन चालविताना स्वयंचित्ता आवश्यक आहे.वाहन चालवितांना मोबाईलसारख्या उपक्रमांचा वापर वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने वाहतुकीच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मंगळवारी येथे बोलतांना केल्या.
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात २४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन माने यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा पोलीस दल, प्रादेशिक परिवहन कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान १५ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.     प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले म्हणाले,की वाहन चालवितांना निष्काळजीपणे वागणे चुकीचे आहे. आपल्या वर्तनामध्ये सुधारण करून नियमांचे पालन करीत वाहतूक सुरक्षाविषयी सुज्ञ नागरिक बनायला हवे.
पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई गांभीर्यपूर्वक करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.डी.आटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी.वाय.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने, प्रदीप शिंदे, कर्नल निकम आदी उपस्थित होते. आभार पी.डी.सावंत यांनी मानले.सूत्रसंचालन सीमा मकोटे यांनी केले.