भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती उत्सवाची सांगता उद्या रविवारी सोलापुरात भव्य मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून या निमित्ताने मिरवणूक सोहळ्यावर प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाला सोलापुरातील परंपरा वैशिष्ठय़पूर्ण आहे. डॉ. आंबेडकर हे हयात असतानासुध्दा त्यांच्यावर असीम प्रेम करणाऱ्या आंबेडकरी समाजाने त्यांची जयंती साजरी करण्यात आली होती. १९३२ सालापासून जयंतीची परंपरा आहे.
गेल्या रविवारी १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाला प्रारंभ झाला होता. शहरात ठिकठिकाणी मिळून ३२१ सार्वजनिक मंडळांनी डॉ. आंबेडकर मूर्ती तथा प्रतिमांची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या आठवडाभरात विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले. विशेषत: दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. तर काही मंडळांनी आपल्या खर्चात कपात करून टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले.
उद्या रविवारी दुपारी पार्क चौकातून (डॉ. आंबेडकर चौक) भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने प्रथमच या मिरवणुकीच्या सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. जी. एम. मागासवर्गीय संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. न्यू बुधवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात उद्यानातील डॉ. बाबासाहेबांचा पुतळा, मिलिंद नगरातील डॉ. बाबासाहेबांचे अस्थिविहार, तसेच पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चार हुतात्मा पुतळे, पार्क चौकातील डॉ. बाबासाहेबांचा पुतळा, भैया चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, सुपर मार्केटमधील महात्मा फुले पुतळा तसेच संपूर्ण मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
या मिरवणुकीत ५६ सार्वजनिक मंडळांचा सहभाग राहणार आहे. एक ते दीड लाख जनसमुदायाच्या सहभागाने पार्क चौकातून प्रारंभ होणाऱ्या या मिरवणुकीची सांगता बुधवार पेठेतील पंचांची चावडी येथे रात्री होणार आहे. या मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यात ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक आयुक्त, २२ पोलीस निरीक्षक, ४३ सहायक निरीक्षक तथा फौजदार, ७७२ पोलीस कर्मचारी, ५० महिला पोलीस कर्मचारी, १८० गृहरक्षक जवान, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी याप्रमाणे पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था राहणार आहे. शहरातील संवेदनशील भागात ६५ ठिकाणी पोलिसांच्या तात्पुरत्या चौक्या उभारण्यात आल्या आहेत.