राष्ट्रीय कर्करोग संघटनेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे १५ व १६ ऑगस्टला वर्धा मार्गावरील रॅडिसन ब्लूमध्ये ‘क्ष-किरणोपचार’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत डोके, तोंड व मान, फुफ्फुस, अन्ननलिका, पुरुषग्रंथी, स्तन, आणि गर्भाशयाचा कर्करोग व त्यावरील उपचार व त्याचे स्वरूप या विषयांवर कर्करोग तज्ज्ञ व शस्त्रक्रिया तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत.
यामध्ये डॉ. व्ही. कन्नन, डॉ. सुमीत बसू, डॉ. बी.के. मोहंती, डॉ. डी.एन. शर्मा, डॉ. देवनारायण दत्त, डॉ. एस.डी. शर्मा, डॉ. ए.यू. सोनवणे यांचा समावेश आहे. सध्या कर्करोगावर अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि उपचार पद्धती निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर या सोयी उपलब्ध नाहीत त्यामुळे ज्या सोयी जेथे उपलब्ध आहेत, तेथेच कर्करोगाचे स्वरूप पाहूनरुग्णांनी गेले पाहिजे. परंतु सध्या जेथे बहुतांश सोयी उपलब्ध आहेत, तेथेच सर्वच प्रकारचे कर्करुग्ण उपचाराला येतात. त्यामुळे गर्दी वाढते व त्याचा परिणाम अत्यावश्यक रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देण्यास अडचणी निर्माण होतो. या अडचणी निर्माण होऊ नयेत व ज्या केंद्रावर ज्या सोयी उपलब्ध आहेत, तेथेच रुग्णांनी जावे व त्याचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती मेडिकलमधील कर्करोग विभागप्रमुख डॉ. के.एम. कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जवळपास दोनशे प्रकारचे कर्करोग आढळतात. यावर क्ष-किरणोपचार (रेडिओथेरेपी), केमोथेरेपी (औषधोपचार) आणि शस्त्रक्रिया या तीन पद्धतीने उपचार केले जातात. क्ष-किरणोपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांनी क्ष-किरणोपचार केंद्रातच उपचार केले पाहिजे. परंतु काही रुग्ण केमोथेरेपी केंद्रातही येतात. त्यामुळे रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सोयी पुरवण्यात अडथळे निर्माण होतात. सध्या कर्करोगावर अत्याधुनिक उपचार पद्धती निर्माण झाल्या आहेत. त्यात सिंगल ग्रेन्झ रे थेरेपी, डिप एक्स-रे, कोबाल्ट६०, सेसीयम १३७, इन्टेसिटी मोडय़ूलेशन, इमेज गायडन्स, इलेक्ट्रॉन थेरेपी, स्टेरोइटॅक्टीट रेडीएशन, प्रोटोन बीम थेरेपी, ब्रॅचीथेरेपी यांचा समावेश आहे. या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील १२५ कर्करोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. १५ ऑगस्टला सकाळी १० वाजता परिषदेस सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परिषद सुरू राहील. सध्या मेडिकलमधील कोबाल्ट युनिट कालबाह्य़ झाला आहे. परंतु पर्याय नसल्याने येथे आवश्यक रुग्णावर उपचार केले जात असल्याचेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.