शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माजी खासदार रामदास आठवले यांच्या गटाची युती असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीत विभागले आहेत. त्यातून नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.
माजी खासदार आठवले यांनी लोकसभेची निवडणूक शिर्डीतून लढविली. त्यांचा पराभव झाल्यानंतर आठवले यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबरची युती तोडून शिवसेना-भाजपशी महायुती केली. पक्षाचे जिल्हय़ातील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड व विजय वाकचौरे यांच्यावर कारवाई केली. बाळासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन पँथरची स्थापनी केली. तर वाकचौरे शांत होते. वाकचौरे यांच्याशी आठवले यांचे पुन्हा जुळले आहे. राजाभाऊ कापसे यांच्याकडे आठवले यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे दिली होती. पण कापसे हे नोकरभरती घोटाळय़ात अडकले. ते सध्या फरार आहेत. पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आठवले यांनी त्यांच्या जागी भीमा बागूल यांची निवड केली.
रिपब्लिकन पक्षाची शिवसेना-भाजपशी युती असली तरी जिल्ह्यात मात्र अशोक गायकवाड तसेच अन्य काही कार्यकर्ते हे काँग्रेस, राष्ट्रवादीशी जवळीक साधून आहेत. दत्तनगर येथे विकासकामांचा नुकताच काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. या वेळी अशोक गायकवाड व रिपब्लिकन पँथरचे बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. अशोक गायकवाड यांनी या वेळी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ससाणे यांच्या पाठीशी उभे राहू, असे सूतोवाच केले. ससाणे हे नेहमी आंबेडकरी चळवळीला साथ देतात, कार्यकर्त्यांना न्याय देतात, विकासकामे करतात, असे गौरवोद्गार काढले. विशेष म्हणजे पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष भीमा बागूल हे देखील या वेळी उपस्थित होते. ससाणे यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार अशोक गायकवाड यांना अडचणीत आणणारे ठरले आहे. पक्षाचे राहुरीचे तालुकाध्यक्ष व देवळाली प्रवराचे नगरसेवक सुरेंद्र थोरात यांनी गायकवाड यांनी पक्षाच्या प्रदेश सचिवपदाचा राजीनामा देऊन ससाणे यांच्याबरोबर काँग्रेस पक्षात जावे, अशी टीका केली आहे.
गायकवाड हे काँग्रेस नेत्याच्या पाठीशी उभे राहण्याची भाषा करतात. ससाणे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत याचे भान त्यांना नाही. काँग्रेसने केवळ दलित जनतेचा मतासाठी वापर केला. आठवले यांचा पराभव घडवून आणला. या काँग्रेसच्या नेत्यांना दलित कार्यकर्ते आठवलेंच्या नेतृत्वाखाली धडा शिकवतील. गायकवाड यांनी पक्षशिस्तीचा भंग केला. कार्यक्रमास उपस्थित असलेले भीमा बागूल यांनी गायकवाड यांना जाब विचारणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही ही खेदाची बाब आहे. गायकवाड यांनी ससाणे यांच्याबरोबर जरूर जावे, पण आधी पक्षाचा राजीनामा द्यावा, असे थोरात म्हणाले.