ऐनवेळी पक्षात येऊन नेतेगिरी करणा-यांना पक्षाची उमेदवारी देऊ नये. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी करणा-या अकोले तालुका काँग्रेसने शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा संभाव्य काँग्रेस प्रवेश व उमेदवारीस एकप्रकारे विरोध केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेमानंद रूपवते यांनाच काँग्रेसचे तिकीट देण्यात यावे अशी मागणीही तालुका काँग्रेसने केली आहे.
अकोले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत शिर्डी लोकसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी रूपवते यांना देण्यात यावी असा ठराव संमत करण्यात आला. खासदार वाकचौरे हेही अकोल्याचेच भूमिपुत्र आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्र्वभूमीवर पक्षात ऐनवेळी येणा-यांना तिकीट न देता ज्यांनी पक्षाचे आजपर्यंत निष्ठेने काम केले त्यांचाच उमेदवारीसाठी विचार करण्यात यावा अशी मागणी करताना तालुका काँग्रेसने खासदार वाकचौरे यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशालाच एकप्रकारे विरोध केल्याचे मानले जात आहे. माजी सभापती दादा पाटील वाकचौरे, भास्कर दराडे, विनोद हांडे, संपतराव कानवडे, आरिफ तांबोळी, अनुराधा आहेर आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.