भाऊसाहेब वाकचौरे यांना गेल्या वेळीच उमेदवारी देणे गरजेचे होते. मात्र आघाडीच्या राजकारणामुळे त्या वेळी ती देता आली नाही, ती आमची चूकच होती अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. खासदार होऊन वाकचौरेंनी त्यांची लोकप्रियता सिद्ध केली, शिवाय काँग्रेसची मागची चूकही त्यांनी आता पदरात घेतली असे ते म्हणाले.
खासदार वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा नेवासे रस्त्यावरील मंगल कार्यालयात पार पडला. या वेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, सहप्रभारी शौर्यराजे वाल्मीकी, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, सुधीर तांबे, माजी खासदार बाळासाहेब विखे, माजी आमदार जयंत ससाणे, माजी मंत्री विजयनवल पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के उपस्थित होते. वाकचौरे यांच्यासमवेत सदा पटारे, रवि गरेला, शिवाजी दौंड आदींसह ५० शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, तीन मंत्री असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राज्यात एकमेव आहे. त्यांच्यामुळे मतदारसंघाचा कायापालट होईल, वाकचौरे यांना काँग्रेस पक्षात उज्ज्वल भवितव्य आहे. ते काँग्रेसच्याच विचाराचे होते. आता ते मुख्य प्रवाहात आले. यापूर्वी अनेक प्रश्नावर त्यांनी भेटी घेतल्या. अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन व मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लागला. त्याकरिता त्यांनी प्रयत्न केले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे गरिबी हटविण्याचे स्वप्न अन्नसुरक्षा कायद्यामुळे पूर्ण होत आहे. महिला विद्यार्थी व गरिबांसाठी अनेक निर्णय आघाडी सरकारने घेतले. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा लवकरच उभा राहात असून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी वाकचौरे हे शिवसेनेत असले तरी ते मनाने काँग्रेसमध्ये होते. ते सर्वधर्मसमभावाचे आचारण करतात. त्यांनी चूक दुरुस्त केली. साईबाबांची आयुष्यभर सेवा करणारे वाकचौरे हे आता देवाच्या आळंदीला पोहोचले आहेत. संसदेत ते कार्यक्षम खासदार होतील. गरिबांच्या प्रश्नावर सतत ते माझा पक्ष पाहू नका, सामान्य माणूस हाच माझा पक्ष आहे, अशी भूमिका घेत त्यांना पक्षात स्थान मिळेल, असे ते म्हणाले.
काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेसकडे विचारधारा आहे. मोदी हे फॅन्सी कपडे घालून गुजरात पॅटर्न राजकारणात आणू पाहात आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री गुजरातमधून तडीपार झाला. एकाला २८ वर्षे शिक्षा झाली, तर तीन मंत्री शिक्षा होऊनही मंत्रिमंडळात आहेत. हुकूमशाह असलेल्या मोदींनी कुठलाही विकास केलेला नाही. त्यांचा केवळ प्रचार सुरू आहे असे ते म्हणाले. आदिवासी विकासमंत्री पिचड यांनी देशात चुकीचे राज्य आले तर सामाजिक परिस्थिती बिघडेल त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीत एकीची आवश्यकता आहे असे सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी काँग्रेस पक्षात येण्यासाठी अनेक माजी आमदार, माजी खासदार तयार आहेत. पण जागा सोडता येत नसल्याने अडचण येते. पक्षात ओघ सुरू आहे. वाकचौरे यांच्यामागे थोरात व विखे हे दोघे मंत्री, माजी खासदार बाळासाहेब विखे हे असून  पिचड यांची साथ आहे. त्यामुळे त्यांचा विजय होईल, पण आता देशात सुरू असलेले वेगळे वारे हाणून पाडण्याचे काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मी मागील निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण राजकीय गणितामुळे वाव मिळाला नाही. सेनाप्रमुख ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी न्याय दिला. साडेचार वर्षे काम करताना पक्षाचा विचार केला नाही. काँग्रेसमध्ये मी लोकांचे भले करण्याकरिता आलो आहे. काँग्रेसच देशाला समृद्ध करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कृषिमंत्री विखे, महसूलमंत्री थोरात, माजी खासदार विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, तांबे, शौर्यराज वाल्मीकी, विनायक देशमुख, माजी मंत्री म्हस्के आदींची भाषणे झाली. आभार सचिन गुजर यांनी मानले. कार्यक्रमास माजी मंत्री विजयनवल पाटील, रामहरी रूपनर, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी गाडे, बाळासाहेब मुरकुटे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे, उबेद शेख, भाऊसाहेब कडू, दीपक पटारे आदी उपस्थित होते.
 अकोले, शेवगाव, नेवासेला नगरपंचायती
राज्य सरकारने तालुक्याच्या गावी असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसांत त्याचा आदेश निघेल. अकोले, शेवगाव, नेवासे येथे नगरपंचायती स्थापन केल्या जातील. तळेगावनजीक जागा मिळाली तर औद्योगिक वसाहत स्थापन करू. शिर्डी येथील विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून, प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर चाचणी घेऊन विमानसेवा सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.