काँग्रेसच्या वचनपूर्ती अभियानांतर्गत कर्जत येथे झालेल्या ब्लॉक मेळाव्यात कार्यकर्त्यांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर जोरदार टीका करतानाच स्वपक्षाच्या मंत्र्यांनादेखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून निरीक्षकांना धक्का दिला.
मेळाव्यास निरीक्षक म्हणून विलासराव म्हस्के उपस्थित होते. युवा नेते राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडूळे, प्रविण घुले, उपसभापती किरण पाटील, बाळासाहेब पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आदी या मेळाव्याला उपस्थित होते.
साळुंके यांनी सुरूवातीलाच पालकमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, पालकमंत्रीच आम्हाला जास्त त्रास देतात. उठसूट कर्जत व जामखेड तालुक्यात येतात. अन्यत्र प्रभावी प्रस्थापित असल्याने तिथे पाचपुते यांना फिरकू देत नाहीत, मात्र येथे येवून आमच्याच विकासाच्या आड ते उभे राहतात. देशमुख म्हणाले, काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी परिभाषा सुरू केली आहे, ही कामे लोकापर्यंत पोहचवली पाहिजे. घुले पक्षांतर्गत गटतट विसरून काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या कोटय़ातून राष्ट्रवादी व शिवसेनेला छावण्या देण्यात येत आहेत, पक्षाचे कार्यकर्त्यांना मात्र दोन, दोन महिने परवानगीसाठी हेलपाटे मारावे लागतात असा आरोप त्यांनी केला. दादासाहेब सोनमाळी, दादासाहेब कानगूडे, मुकूटराव काळे यांची यावेळी भाषणे झाली.