जुने वैमनस्य आणि प्रॉपटीच्या वादातून एमआयडीसी परिसरात बाबडे सभागृहासमोर बुधवारी मध्यरात्री एका ठेकेदाराची हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या एका सहकाऱ्यालावरही वार करण्यात आले. त्याच्यावर लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
अजय माधवराव कडू (३२) असे मृताचे नाव असून जखमी पिंटू पाटील हा त्याच्यासोबत अनेक दिवसांपासून काम करीत होता. हिंगणा टोल नाक्याजवळील एका जमिनीवरून अजय आणि फिरोज पठाण यांचा वाद सुरू असून त्या वादातून अजयची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना यादवच्या बहिणीचे लग्न असल्यामुळे बुधवारी सायंकाळी अजय कडू, पिंटू पाटील आणि दीपक वर्मा एमआयडीसी परिसरातील बाबडे सभागृहात लग्न समारंभासाठी आले होते. रात्री उशिरा तिघेही एमआयडीसी परिसरातील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी आरोपी फिरोज पठाण (गोपालनगर), वीरेंद्र खैरवार, आणि राजेश लोखंडे पोहोचले. सर्व एकत्र बसून दारू पित असताना कुठल्या तरी कारणावरून त्याचा वाद झाला. फिरोज पठाण आणि अजय बारच्या बाहेर आल्यावर त्या दोघांमध्ये पुन्हा वादावादी होत असताना सहकाऱ्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व पुन्हा बाबडे सभागृहात आले. जेवण केल्यानंतर फिरोज, वीरेंद्र आणि राजेशने अजयला सभागृहाच्या बाहेर बोलविले आणि तिघांनी मिळून चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी अजयच्या पोटावर, छातीवर आणि डोक्यावर सपासप वार केले. गोंधळ ऐकून अजयचा मित्र पिंटू बाहेर आला असता त्याच्यावर सुद्धा चाकूने वार करण्यात आले. अजयच्या तिसरा साथीदार दीपक वर्माचा त्यांनी सभागृहात जाऊन शोध घेतला शोध घेतला मात्र तो पसार झाल्याने त्याचा जीव वाचला. घटनेनंतर आरोपी कारमधून फरार झाले.  अजय आणि पिंटू रक्ताच्या थोराळ्यात पडले असताना एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केले. जखमी पिंटूवर उपचार सुरू आहेत. अजयचा खून करण्यात आल्याची बातमी टाकळी सीम परिसरात कळताच अजयचे साथीदार घटनास्थळी आल्यानंतर त्यांची पोलिसांशी बराच वेळ वादावादी झाली. त्यामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोपी फरार झाल्यानंतर ते शहराबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी नाकाबंदी केली. वर्धा जिल्ह्य़ातील देवळी परिसरात नाकाबंदी दरम्यान फिरोज पठाण, वीरेंद्र खैरवार आणि राजेश  लोखंडे या तीन आरोपींना अटक करण्यात आली. वर्धा पोलिसांनी तीनही आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. अजय कडू हा एका काँग्रेस नेत्याचा सक्रिय कार्यकर्ता असून एमआयडीसीमधील पिक्स कंपनीतील लेबर ठेकेदार होता. या कंपनीचा ठेका अजयला न मिळता आपल्याला मिळावा यासाठी वीरेंद्र खैरकर प्रयत्नात होता मात्र त्याने पैसा देऊन त्याने ठेका मिळविला होता त्यामुळे वीरेंद्र आणि अजयचे या कारणावरून वैमनस्य निर्माण झाले होते.