पां. भा. करंजकर यांची तक्रार
सिंहस्थ आणि निवडणुकीच्या उंबरठय़ावर विकास योजनांची जोरदार चर्चा व घोषणा सुरू आहेत. प्रत्यक्षात असलेल्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे, असा आरोप भ्रष्टाचार विरोधी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी केला आहे.
विकासासाठी कोटय़वधी रूपयांची मागणी केली जात आहे. परंतु वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेल्या शासकीय मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्मितीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. भाडय़ाच्या जागांमध्ये अनेक कार्यालये असून भाडय़ापोटी प्रचंड खर्च केला जात आहे.
पाच जिल्ह्य़ांसाठी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली आणण्याची आज नितांत आवश्यकता आहे. या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी काहीच का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.
न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठय़ा  संख्येने विद्यार्थी बसच्या प्रतिक्षेत उभे असतात. बसथांब्यावर बस आल्यानंतरती पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची कायम धावपळ होत असते. या विद्यार्थ्यांची ही धावपळ त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. मात्र  या विद्यार्थ्यांची व्यथा कोणीच लक्षात घेत नाही.  या भागातील लोकप्रतिनिधी हा सर्व प्रकार उघडय़ा डोळ्यांनी बघत आले आहेत. परंतु ही समस्या सोडविण्यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. रेडक्रॉस व रविवार कारंजा परिसर तसेच शालिमार येथे शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी होणारी धावपळ धोकादायक आहे. अलिशान मोटारींमधून फिरणाऱ्या येथील लोकप्रतिनिधींना समज केव्हा येणार, असा सवालही करंजकर यांनी उपस्थित केला आहे.