भ्रष्टाचारी व्यक्ती सामान्य माणसाच्या नजरेतून उतरली पाहिजे, त्यासाठी त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घाला, असे आवाहन न्या. संतोष हेगडे यांनी केले. श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. संतोष हेगडे यांना राष्ट्रीय न्यायगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या हस्ते न्या. हेगडे यांना ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य अनिरुध्द जाधव, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, उद्योजक अजय ठक्कर उपस्थित होते. यावेळी न्या. हेगडे म्हणाले, ‘ग्रीड ओव्हर नीड’ हा समाजाला लागलेला भयंकर असा रोग आहे. या रोगामुळे माणसातील माणूसपणच नाहिसे होते. पैशासमोर भ्रष्टाचारी माणसाला दुसरे काही दिसत नाही. एनकेन प्रकारे पैसे मिळविणे हेच त्याचे उद्दिष्ट राहते. त्यामुळे त्यांच्या लेखी मूल्यांना काही किंमत राहात नाही. आज आपल्याकडे वरकमाई करून श्रीमंत झालेल्यांची संख्या मोठी आहे.
समाजातील लोक त्याच्या फक्त श्रीमंतीकडे पाहतात. ती श्रीमंती कशी आली आहे? याकडे मात्र पाहात नाहीत. समाजाने आपला दृष्टिकोन बदलून जो भ्रष्टाचारी आहे त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची तयारी ठेवली पाहिजे. गेल्या साठ वर्षांत देशभरात प्रचंड घोटाळे झाले. १९५० साली पहिला सार्वजनिक घोटाळा हा ५२ लाखांचा होता. त्यानंतर घोटाळे चढत्या क्रमाने वाढत गेले. आता कॉमनवेल्थ, टू जी, कोलगेट या घोटाळय़ातील आकडय़ांचा हिशोबही करता येत नाही. हे उघड झालेले घोटाळे आहेत.
अद्याप उघड होणे शिल्लक असलेले अनेक घोटाळे आहेत. हा सर्व पैसा विकासाच्या कामी लागला असता तर देशाचा किती विकास झाला असता, याचे गणित सहज लावता येईल. सर्व साधनसंपत्तीने संपन्न असलेला आपला भारत देश कुपोषणात सोमालिया पेक्षाही पुढे आहे. आरोग्यावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ १.५८ टक्के इतका खर्च होतो. जगभरात सरासरी ८ टक्के आरोग्यावर खर्च केले जातात. देशाचे हे चित्र तरुण बदलू शकतात. समाधान, तृप्ती याचा अर्थ त्यांना समजावून सांगितला पाहिजे. चांगले आणि वाईट यातील फरक आता फारच अंधूक राहिला असल्यामुळे नव्या पिढीला या बाबी नीट समाजावून सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
देशात न्याय ही संकल्पनाच कमजोर होत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. घटनेने न्याय, समता, बंधुत्व ही मूल्य दिली असली तरी दुर्दैवाने जातीयवाद, भेदाभेद व आर्थिक विषमता प्रचंड वेगाने वाढते आहे. अनधिकृत घरांसाठी गरिबांवर हात टाकला जातो तर श्रीमंत पैशाच्या जोरावर अधिकृततेवर सहज हक्क कमवतात, शिवाय सन्मानही. ही विषमता हे आगामी काळातील मोठे आव्हान असल्याचे पाटकर म्हणाल्या. राज्य सरकारे ही केवळ पोपट बनून काम करत आहेत. राजकारणी, प्रशासकीय यंत्रणा व पैसे कमावणारे कंत्राटदार यांची सांगड होऊन सामान्यांना लुटले जात आहे. डोंगर कोसळत आहेत.
नद्या गाळांनी भरत आहेत व सामान्य माणसांचा जीव जातो आहे. सर्वाधिक धरणे असणाऱ्या महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वाचे मुख्य कारण सामान्य माणसाचे हित डोळय़ासमोर ठेवून नियोजन केले जात नाही. मूल्यहिनतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळेच सामान्यांना संकटे झेलावी लागत आहेत. न्या. संतोष हेगडे यांनी कर्नाटकात केलेल्या उचित कामाचा लातूरकरांनी केलेला गौरव हा अतिशय स्तुत्य असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय ठक्कर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश बेळंबे व अविनाश जगताप यांनी केले तर आभार प्रभाकर सगर यांनी मानले.