शहराच्या वैभवशाली परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील कौन्सिल हॉलचे नूतनीकरण बारगळल्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत. आगीत भस्मसात झालेल्या या सभागृहाचे आता खंडहर झाले असून, त्याकडे मनपाचेच दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गेल्या महाराष्ट्रदिनी दि. १मेला लागलेल्या भीषण आगीत हे वैभवशाली सभागृह जळून खाक झाले. केवळ तत्कालीन नगरपालिका किंवा मनपाच नव्हेतर शहराच्या एकूणच सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिक चळवळीचा मूक साक्षीदार आणि त्याच्या खास शैलीमुळे वैशिष्टय़पूर्ण ठेवा असलेले हे सभागृह एका रात्रीत काळाच्या पडद्याआड गेले. या वैशिष्टय़ामुळेच नगरकरांना त्याचे शल्य अजूनही बोचते आहे. मात्र आगीनंतर होणारे नियमित सर्व सोपस्कार करून मनपाने या सभागृहाचे मूळ रूपात नूतनीकरणाची भीष्मप्रतिज्ञा केली होती, ती आता हवेतच विरली आहे. गेल्या आठ महिन्यांत कोणी त्याचा साधा विषयही काढला नाही किंवा त्याची फाइलही उघडलेली नाही.
वैशिष्टय़पूर्ण शैलीतील मुख्यत्वे लाकडी काम, सभागृहात लावलेल्या राष्ट्रपुरुषांच्या दर्जेदार तसबिरी, त्यातील हुबेहूब चित्रकारिता आणि प्रेक्षक गॅलरी हे या सभागृहाचे वैभव होते. ते केवळ या वास्तूचेच नव्हते, तर विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने या सभागृहात हजेरी लावून ही श्रीमंती कमालीची वाढवली होती. येथे हजेरी लावण्याचा मोह अनेक दिग्गजांना आवरता आला नव्हता. अनेकांना तर सभागृहाने मोहिनीच घातली होती. या विविध कारणांनी हा शहराच्या प्रतिष्ठेचा मानबिंदू होता.
आगीत भस्मसात झाल्यानंतर मनपाने पठडीतील सरकारी खाक्या दाखवत चौकशीसाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमली. या समितीने बरीच माहिती घेतली, लोकांचे जाबजबाब घेतले असे सांगितले जाते. प्रत्यक्षात डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखाच हा प्रकार ठरला. चौकशीचा मोठा देखावा करूनही समितीला आगीचे कारणच समजू शकले नाही. ते अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र या सभागृहाचे पुन्हा नूतनीकरण करण्याचाही संबंधित सर्वानाच विसर पडलेला दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार समितीचा अहवाल आल्यानंतर दोन-चार दिवस त्याची चर्चा झाली. पुढे मात्र या फाइलवर धूळच साचली आहे.
मनपाचे तत्कालीन शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांचाही या चौकशी समितीत समावेश होता. आगीनंतर त्यांनी या इमारतीची त्यांनी खास एनडी टेस्ट केली होती. इमारतीच्या स्थैर्याची चाचणी असेच त्याचे स्वरूप होते. पुणे येथील निष्णात एजन्सीकडून ही चाचणी करून घेण्यात आली. आनंदाची गोष्ट म्हणजे ही चाचणी कमालीची सकारात्मक आली होती. इमारतीचे मूळ स्ट्रक्चर पक्के असून त्याला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे या चाचणीत स्पष्ट झाले. त्यानुसार कुलकर्णी यांनी नूतनीकरणाचा पाठपुरावाही केला. मात्र पुढे कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. ही चाचणी घेताना सभागृहात १ हजार ७०० पोते खडी भरून ठेवण्यात आली होती. सध्या भग्नावस्थेत असलेल्या या सभागृहाने हा भारही लीलया पेलला.
पुणे येथील एजन्सीने दिलेल्या सल्ल्यानुसार या सभागृहातील केवळ गॅलरीचा बार कमी करावा लागेल. फायबर किंवा लाकूड वापरून हे काम पूर्वीप्रमाणेच होऊ शकेल. मात्र एकूणच या नूतनीकरणासाठी २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याची मनपाकडे तरतूद नाही. इमारत दुरुस्तीचे लेखाशीर्षच नसल्याचे समजते. मात्र केवळ हेच कारण नाही, तर मुख्यत्वे राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच हे नूतनीकरण रेंगाळण्यामागचे मुख्य कारण आहे. आगीनंतर गेली सात महिने शिवसेना-भाजप युतीकडे मनपाची सत्ता होती. त्यांनी या कामात रसच दाखवला नाही. आता नुकतीच ही सत्ता राष्ट्रवादीकडे आली आहे. मनपात सत्तांतर होऊन पंधराच दिवस झाले, हे खरे असले तरी नवे महापौर संग्राम जगताप यांच्या अजेंडय़ावर अजून तरी हा विषय आलेला दिसत नाही. अशीच स्थिती राहिली तर शहरातील अन्य काही योजनांप्रमाणेच कालांतराने कौन्सिल हॉलचे नूतनीकरणही बारगळण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.