माझ्या डोक्यात खूप कल्पना आहेत, पण त्या कुठे जाऊन मांडू आणि त्यावर काम करण्यासाठी कुठे प्रयोगशाळाही नाही, असे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात पडत असतात. त्यांच्या या प्रश्नाला राज्याच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने उत्तर शोधले असून लवकरच त्याचे काही नमुने आपल्याला पाहावयास मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांना विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दहा ते पंधरा शाळा मिळून एक ‘सायन्स इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ उभारण्याची योजना या आयोगाने आखली आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये आवड निर्माण करून त्यांना विविध प्रयोग करता येणे शक्य होणार आहे. ही प्रयोगशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हे केंद्र उभारण्यासाठी शाळांनी प्रस्ताव पाठवायचे असून त्यातील काही शाळांची निवड केंद्र उभारणीसाठी केली जाईल. प्रत्येक शाळेत वेगवेगळे केंद्र उभारण्यापेक्षा १० ते १५ शाळांसाठी एकच केंद्र उभारावे व तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या विचाराने या केंद्राची कल्पना समोर आल्याचेही ते म्हणाले. केंद्र उभारण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या रकमेतील काही भाग आयोगातर्फे देण्यात येणार असून पुढीच पाच वष्रे केंद्राचा नियमित खर्च आयोगच करणार आहे. यानंतर त्याचा खर्च ज्या शाळेत केंद्र आहे त्यांना करावा लागणार आहे. यामुळेच शाळेची निवड करत असताना ती शाळा हे केंद्र योग्य प्रकारे चालविण्यास सर्वार्थाने समर्थ आहे की नाही हे तपासले जाणार असल्याचेही ते म्हणाले. प्रायोगिक तत्त्वावर सध्या हे केंद्र प्रवरानगर आणि वारणानगर येथे उभारण्यात येत असून केंद्र उभारणीचे काम नेहरू विज्ञान केंद्राकडे सोपविण्यात आल्याचेही काकोडकर यांनी स्पष्ट केले. सध्या शाळांकडून येणाऱ्या प्रस्तावाचा वेग कमी असून सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी किमान एक तरी केंद्र स्थापन व्हावे, अशी अपेक्षाही काकोडकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात ज्याप्रमाणे इनोव्हेशन हब तयार करण्यात आले आहे त्याचप्रमाणे शाळांमधील हे केंद्र उभारले जाणार असल्याचे नेहरू विज्ञान केंद्रातील शिक्षणप्रमुख श्रीकांत पाठक यांनी सांगितले.
नीरज पंडित, मुंबई