गेवराईतील शिक्षक राजेंद्र घाडगे यांच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. शिक्षकानेच या खुनाचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. या कटात मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. खुनाचा कट रचणाऱ्या शिक्षकासह पोलीस कर्मचारी व अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली.
जिल्हय़ातील गेवराई येथे गेल्या २८ डिसेंबरला पं. स.चे उपसभापती यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहणारे शिक्षक राजेंद्र बाबासाहेब घाडगे यांचा गोळय़ा घालून खून करण्यात आला. या प्रकरणात गेवराई येथीलच प्रल्हाद िशदे यांच्या फिर्यादीवरुन गट शिक्षणाधिकारी नागनाथ मालाजी िशदे व दत्तात्रय चौधरी या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. या खून प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. शिक्षक शिवाजी सर्जेराव चौरे (टाका, तालुका अंबड, ह. मु. गेवराई) याची दैठण येथून मौजे सिंदफणा चिंचोली येथे बदली झाली होती. ही बदली मृत घाडगे यांच्या सांगण्यावरुन झाली होती. त्यामुळे गरसोय होत असल्याने व मृत घाडगे नेहमी मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरुन चौरे याने घाडगे यांच्या खुनाचा कट रचला.
मुंबईतील पोलीस कर्मचारी परमेश्वर रावसाहेब बडे याच्यासह नामदेव एकनाथ घुगे (टाका, तालुका अंबड) व सुनील परसराम वाघ (हर्शी, तालुका पठण) यांच्या मदतीने २८ डिसेंबरला घाडगे यांची गोळय़ा घालून हत्या केली. या प्रकरणात चारही आरोपींना अटक झाली. चौरेच्या सांगण्यावरुनच कट रचून घाडगे यांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.