म्हैसाळ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील बेकायदेशीर दरवाजे उचलून कळंबी शाखा कालव्यातून पाणी चोरून घेतल्याबद्दल लाभधारकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असून संबंधित एका उपअभियंत्यासह तेरा अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता एम.एस.धुळे यांनी शनिवारी दिली.  शुक्रवारी रात्री शेतक-यांनी तिसऱ्या टप्प्यातून बेकायदेशीर पाणी घेतल्याचे आज स्पष्ट झाले.
म्हैसाळ योजनेतून दि. २ जानेवारीपासून पाणी वितरण करण्यात येत आहे.  दि. ७ जानेवारीपासून कालवा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.  वीजबिलासाठी या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील २५ हजार हेक्टर क्षेत्रातून मागणी नोदविली जाण्याची अपेक्षा जलसंपदा विभागाची होती.  मात्र प्रत्यक्षात मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव आणि जत तालुक्यातून अवघा ३०० हेक्टर क्षेत्राची मागणी नोंदविली गेली.  त्यामुळे चार दिवसांपूर्वी कालव्यातील पाणी पुरवठय़ामध्ये कपात करण्यात आली होती.
राजकीय दबाव वाढू लागताच पुन्हा पाणी वाढविण्यात आले. पहिल्या टप्प्यात चार आणि दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात प्रत्येकी दोन पंप सुरू ठेवण्यात आले आहेत.  नियोजित पाणी वाटपानुसार कळंबी शाखा कालव्याला सध्या पाणीपुरवठा करण्यात येणार नव्हता.  मात्र शेतक-यांनी शुक्रवारी रात्री कळंबी शाखा कालव्याचे फाटक उघडून पाणी सोडले आहे.  शनिवार सायंकाळपर्यंत हे पाणी एरंडोली हद्दीतून बाहेर पडले असून या पाण्याचा प्रवास १४ किलोमीटर झाला आहे.
 या संदर्भात कार्यकारी अभियंता एम.एस.धुळे यांनी सांगितले, की पाण्याचा लाभ घेतलेल्या क्षेत्राचा सव्‍‌र्हे करण्यात येणार असून त्यांच्यावर दीडपट पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार आहे.  प्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल करण्याची जलसंपदा विभागाची तयारी आहे.  या पाण्याच्या चोरी प्रकरणी एक उपअभियंता व बारा कनिष्ठ अभियंता यांना जबाबदारी निश्चित करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.