लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पोलीस बंदोबस्त शिथिल झाल्यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे. खून, मारहाण करून लूटमार, घरफोडी व विनयभंगासारखे घडणारे प्रकार हे त्याचे निदर्शक.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या काळात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेची फिरती पथके कार्यरत होती. या सर्व घडामोडींमुळे गुन्हेगारी घटनांवर प्रतिबंध आला होता. तपासणीसत्रामुळे काही संशयित गुन्हेगारही पोलिसांच्या जाळ्यात सापडले. मतदानापर्यंत टिकून राहिलेली ही स्थिती आता हळूहळू बदलत आहे. पोलीस बंदोबस्तात काहीशी शिथिलता आल्यावर गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. द्वारका चौकात एका नागरिकाला मारहाण करून लुटण्यात आले. या प्रकरणी संकेत पिपाडा (पुणे) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुरुवारी दुपारी चार संशयितांनी आपली मोटार अडवून गाडीला धडक दिल्याची बतावणी केली. मारहाण करून संशयितांनी आपली सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून वाहनावरून पलायन केले, असे तक्रारीत म्हटले आहे. दिवसाढवळ्या अतिशय वर्दळ असलेल्या परिसरात लूटमारीचा हा प्रकार घडला. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत तत्पूर्वी खुनाचा प्रकार घडला होता. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोखंडी गज चोरण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत नासिर निसार शेख याचा मृत्यू झाला. या प्रकरणी इफ्तेकार निसार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलीप थाटशृंगार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठक्कर बझार बसस्थानकातील विश्रांतिगृहात मद्यप्राशनास मज्जाव केल्यावरून अमोल देविदास गांगुर्डेने एसटी चालक-वाहकांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकालगतच्या बंद घरातून चोरटय़ांनी ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. पंचरत्न सोसायटीतील विजय हिरे यांच्या घरात हा प्रकार घडला. चोरटय़ांनी घराचा कडीकोयंडा तोडून दोन मंगळसूत्र, एक सोन्याचे नेकलेस, चांदीचे शिक्के असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विनयभंगाची घटना घडली. अरुण कपूर या संशयिताने आपला पाठलाग केला, याबद्दल विचारणा केली असता शिवीगाळ करून मारहाण व विनयभंग केल्याची तक्रार महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार पाहून आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली असता संशयित पळून गेला. या प्रकरणी कपूरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.