शहराजवळील नागरदेवळे (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत हुल्लडबाज जमावाने पोलीस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. दगडफेकीत एका अधिकाऱ्यासह चौघे पोलीस जखमी झाले. पोलिसांच्या एका जीपच्या काचाही फुटल्या. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. त्यामध्ये तिघे जखमी झाले. भिंगार कॅम्प पोलिसांनी चार महिलांसह १८ जणांना रात्री ताब्यात घेतले आहे.
दुपारी अडीच-तीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस उपअधीक्षक श्याम घुगे यांनी फौजफाटय़ासह घटनास्थाळी धाव घेतली. सायंकाळी त्यांच्याशी संपर्क साधला असता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरदेवळे, आलमगीर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धनवट, पोलीस शिपाई सुभाष थोरात, शेरकर व आणखी दोन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. लाठीमारात मोहसीन शेख, शाकीर शेख व आणखी एक जण (रा. आलमगीर) जखमी झाले. यासंदर्भात रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार नागरदेवळे ग्रामपंचायतीचा उपसरपंच चिंटू ऊर्फ सतेज उत्तम आल्हाट याची सहा महिन्यांपूर्वी नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयासमोर, भरदिवसा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या रिक्त झालेल्या जागेवर, प्रभाग क्रमांक ५ मध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होते, सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानकेंद्र सावतानगरमधील जि.प. शाळेत होते. दुपारी माजी सदस्य अफ्रोज शेख बिलाल हा गोंधळ घालत सारखा मतदानकेंद्रात ये-जा करत होता, बंदोबस्तावरील उपनिरीक्षक धनवट यांनी त्याला प्रतिबंध केला, त्यावरून दोघांत बाचाबाची झाली. शेख याने धनवट यांना धक्काबुक्कीही केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तेथून हुसकावून लावले. शेखसह सुमारे ७० ते ८० जणांचा जमाव काठय़ा घेऊन आला व त्यांनी धनवट यांना गराडा घालत पुन्हा धक्काबुक्की सुरू केली. तेथे तीन-चारच पोलीस होते. त्यांनी आणखी कुमुक मागवली, जवळच स्ट्रायकिंग फोर्सची गाडी होती, ते जवान तेथे आले. जमावाने या गाडीवर (एमएच १६ एन ३८९) दगडफेक केली, त्यात गाडीच्या काचा फुटल्या. चौघे पोलीस जखमी झाले. जमावाच्या तावडीतून धनवट यांची सुटका करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
उपअधीक्षक घुगे माहिती मिळताच तेथे धावले. त्यांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना, ताब्यात घेतलेल्या लोकांना पोलिसांनी सोडावे म्हणून महिलांचा जमावही पोलिसांच्या गाडीपुढे आडवा पडला. अखेर महिला पोलिसांना पाचारण करून त्यांना हटवावे लागले. अफ्रोज, सय्यद मुजाहिद रहीद, शौकत सुलेमान यांच्यासह चार महिला अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.