बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे गुरूवारी सकाळी कराड विश्रामगृहावर अल्पकाळासाठी थांबले. या वेळी प्रांताधिकारी संजय तेली, पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, तहसीलदार सुधाकर भोसले व सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता पी. आर. पनदारे यांनी त्यांचे स्वागत केले. येथे तिबेटी निर्वासित नागरिक व हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी लामा यांनी केली.
स्थानिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांच्या मोठय़ा उपस्थितीला त्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. दलाई लामा यांनी कराड विश्रामगृहामध्ये भोजन करून ते मोटारगाडीने पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीची तर झुंबड उडाली होती. मात्र, या माध्यमप्रतिनिधींशी न बोलता केवळ ‘थँक्यू’ म्हणत ते मोटारगाडीने पुण्याला रवाना झाले. तिबेटियन सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या दलाई लामा यांना केंद्रशासनातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. सकाळी नियोजित वेळेअगोदर सुमारे अर्धा तास त्यांचे विश्रामगृहावर आगमन झाले. या वेळी प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी आवर्जुन उपस्थित होते.