आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतसह मोनिका आथरे, अंजना ठमके या मुलींच्या यशामुळे नाशिक येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर सराव करणाऱ्या मुलांची कामगिरी तशी झाकोळलेली राहिलेली आहे, परंतु अलीकडील काळात आपल्या नावाची विशेष ओळख निर्माण करण्यात काही मुलेही यशस्वी झाली असून किसन तडवी यांसह दत्ता बोरसे, सुरेश वाघ, कांतिलाल कुंभार ही त्रिमूर्ती त्यापैकीच. सर्वसाधारण कुटुंबातील या मुलांच्या कामगिरीची दखल आता सर्वानाच घेणे भाग पडू लागले आहे.
दत्ता हा सुरगाण्यापासून १२ किलोमीटरवर असलेल्या खडकीचा, सुरेश वणीचा तर कांतीलाल पेठचा. दत्ता कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांत, तर सुरेश आणि कांतिलाल दोघेही प्रथम वर्षांत शिकत आहेत. केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दत्ता बोरसेला धावण्याची आवड निर्माण होण्यास कारणीभूत ठरली दशरथ पाटील महापौर असताना आयोजित महापौर चषक क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेत अगदी सहज म्हणून १७ वर्षांआतील गटात सहभाग घेणाऱ्या दत्ताने चक्क पहिला क्रमांक मिळविला. त्याबद्दल ७५० रुपये रोख मिळाल्याने जर धावून पैसे मिळत असतील तर धावण्याचा सराव करण्यास काय हरकत, असे म्हणून त्याने सरावास सुरुवात केली. त्याने जानेवारी २०१३ मध्ये कोलकाता येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २१ किलोमीटर अंतर एक तास सात मिनिटात पूर्ण करून सुवर्ण तसेच नागपूर येथे झालेल्या क्रीडा महोत्सवात पाच हजार मीटर धावण्यात सुवर्ण, १५०० मीटरमध्ये कांस्य अशी चमक दाखवली. त्याआधी जानेवारी २०१२ मध्ये पुणे येथे झालेल्या २० वर्षांआतील फेडरेशन क्रॉस कंट्री स्पर्धेत दत्ताने चौथे स्थान मिळविले होते. दहावीपर्यंत असताना जळगाव व धुळे येथील शालेय विभागीय स्पर्धेतही दत्ताने प्रथम स्थान पटकावून चमक दाखविली. अकरावीनंतर तो भोसला येथील साई केंद्रात सरावासाठी येऊ लागला. दत्ताच्या घरची परिस्थिती साधारण. वडील नाशिकमध्येच एका ठिकाणी वॉचमन म्हणून काम करतात. घरची परिस्थिती बदलण्याचे स्वप्न बघत तो दररोज सकाळ व सायंकाळ मैदानावर घाम गाळत आहे. २०१२-१३ वर्षांसाठी पुणे विद्यापीठाचा ‘वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ हा गौरव, ही तर कुठे त्याच्या यशाची सुरुवात आहे.
जानेवारी २०१३ च्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलीट’ असा नावलौकिक प्राप्त करणाऱ्या सुरेश वाघने २००७ मध्ये झालेल्या मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत सातव्या इयत्तेखालील गटात सहभाग घेत सातवा क्रमांक मिळविला होता. औरंगाबाद येथील आंतरशालेय स्पर्धेत त्याने पाचव्या स्थानावर झेप घेतली होती. दहावीला असताना तो भोसलाच्या मैदानात सरावासाठी येऊ लागला. २०१३ ची विद्यापीठ स्पर्धा सुरेशसाठी बहुमोल ठरली. या स्पर्धेत १५०० मीटरमध्ये प्रथम, ८०० मीटरमध्ये द्वितीय, तर पाच हजार मीटरमध्ये द्वितीय अशी त्याची कामगिरी राहिली. सुरेशचे वडील मजुरी करतात. नाशिकच्या या केंद्राबद्दल माहिती मिळण्यास उशीर झाला, अन्यथा आज आपली कामगिरी कितीतरी पटीने चांगली झाली असती, अशी खंत त्याला आहे.
दत्ता व सुरेश यांच्यासह कांतिलाल कुंभार या नावाचीही चर्चा सध्या नाशिकच्या अ‍ॅथलिट क्षेत्रात होऊ लागली आहे. समाजकल्याण विभागाच्या अखिल भारतीय स्पर्धेत पाच किलोमीटर धावण्याच्या गटात त्याने रौप्यपदक मिळविले, तर अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत २१ किलोमीटरमध्ये तो द्वितीय आला. मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत पाच हजार मीटरमध्ये सलग दोन वर्षे कांतिलालने प्रथम क्रमांक मिळविला आहे. पेठपासून २५ किलोमीटरवर असलेले उंबरदहाड हे हजार लोकवस्तीचे गाव. कांतिलाल याच गावचा. सध्या तो सावरकरनगरमधील एका बंगल्याच्या आवारात असलेल्या बगिचाच्या देखभालीचे काम बघतो.
तिघांच्या घरची परिस्थिती सारखी असणे हे त्यांच्यातील मैत्री घट्ट होण्याचे कारण ठरले आहे. महिंद्रा कंपनीने नाशिकच्या इतर खेळाडूंसह या तिघांनाही दत्तक घेतले असून, प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही उत्तम कामगिरी करून दाखविण्याचा आत्मविश्वास तिघांमध्ये आहे.