ललित लेखन, कविता आणि हजारो श्रोत्यांना खिळवून ठेवणाऱ्या अमोघ वक्तृत्वाची दैवी देणगी लाभलेल्या कविवर्य ग्रेस यांच्या ‘पंथविरामाला’ उद्या, २६ मार्चला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांच्या स्मृतीत कायम दडलेल्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. ‘ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता..’ या कवितेतून आई गेल्याचे दु:ख मांडणाऱ्या या कवीने महाराष्ट्राला वेड लावले होते.. जिवंतपणीच दंतकथा झालेला हा कवी फारसा कोणात मिसळत नव्हता परंतु, ज्यांचा झाला त्या प्रत्येकाचा तो आपला झाला. स्पष्टवक्ता आणि व्यासपीठावर बोलताना आयोजकांचीही भीड न बाळगणाऱ्या ग्रेसांचा एक आदरयुक्त धाक अवघ्यांना होता. मनमौजी आणि मूडी म्हणून प्रख्यात पावलेल्या ग्रेसांच्या ‘दुबरेध’ लिखाणातून उतरलेले साहित्य आज महाराष्ट्राचा अनमोल ठेवा बनलेले आहे. ग्रेसांच्या ‘दुबरेध’ साहित्यावर हजारो चर्चा रंगल्या पण, त्यांचा ताजेपणा सतत कायम राहिला.
ग्रेस यांचे पोहण्याचे वेड सर्वज्ञात होते. महाराष्ट्राचा एवढा मोठा साहित्यिक कधीही वरवरच्या दिखाव्याला भुलला नाही. एक जुनीपुरानी लुना घेऊन गल्लोगल्ली फिरणाऱ्या ग्रेसचे महत्त्व त्यामुळे कमी झाले नव्हते. उले त्यांच्याविषयची एक गूढ आकर्षण अधिकाधिक वाढू लागले होते. ज्यांनी ग्रेस ऐकला त्यांनी कायमचा कानात साठवून ठेवला. अमोघ वक्तृत्वाने हराआत्मप्रौढीत जगणारा एक कलंदर म्हणूनच ते ओळखले गेले. दुबरेध कवितांमुळे सर्वपरिचित झाले. ज्यांनी ग्रेसला समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना तो उलगडला की नाही, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, त्यांचे ग्रेसवरील प्रेम ढळलेले नाही.. ज्यांनी ग्रेस यांना नाकारले त्यांनी ग्रेस यांच्या कविताही नाकारल्या पण, ग्रेस नावाच्या दुबरेध व्यक्तिमत्त्वाने त्यांचा कधी दु:स्वास केला नाही.  फोटोचा भयंकर नाद असलेल्या ग्रेस यांच्या आयुष्यातील शेवटची १५ वर्षे म्हणजे आगळेवेगळे युग होते. त्यांनी वेशभूषा बदलली, कपडे केसांची स्टाईल बदलली. त्यांनी कार्यक्रमांचे निमंत्रण स्वीकारणे सुरू केले. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा सहभाग राहिला, अशी आठवण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा आलासे यांनी विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित ‘ग्रेस नावाचं गारूड’ या संपादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना सांगितली.
भाषेच्या बाबतीत नवनवे प्रयोग स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी सहज पेलले. यातून तरुणाईकडे जाण्याची त्यांची ओढ लपून राहिली नाही. खरेतर १९७५ ते १९९५ हा काळ ग्रेस यांच्या साहित्य आणि कवितांचा सुवर्णकाळ राहिला. ललित लेखांचा वाचकवर्ग वाढला. यात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती, असे विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष वामन तेलंग म्हणाले.
उद्या, ग्रेस यांना जाऊन एक वर्ष होईल, मात्र चाहत्यांच्या मनातील आठवणींचा सागर तसाच अथांग राहणार आहे.. ‘ग्रेस’ यांची मोहिनी कुणालाही हिरावता येणार नाही. ‘दुबरेध’ म्हटला गेलेला हा कवी आजही तेवढाच लोकप्रिय आहे आणि राहील, त्याच्या दंतकथा चर्चेत राहतील. त्याच्या सहवासात राहिलेले जुन्या आठवणींना पुन्हा पुन्हा उजाळा देत राहतील..