भूमिगत गटारांमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते फोडल्याने पूर्णत्व प्रमाणपत्र मिळत नाही तोवर रस्त्यांची कामे सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने स्पष्ट नकार दिल्याने सहा मुख्य रस्त्यांचे काम लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, शिवास्वाती कंपनीने १५ जानेवारीपर्यंत दोन्ही मुख्य मार्गांची कामे पूर्ण करून देण्याचे पत्र दिले असले तरी एवढय़ा कमी कालावधीत ते शक्य नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पंचशताब्दीनिमित्त या शहरात विकास कामांसाठी शासनाने २५० कोटीचा निधी दिला आहे. या निधीतूनच शहरातील सहा मुख्य रस्त्यांचे काम करण्यात येणार आहेत. पालिकेच्या कामांचा दर्जा बघता रस्त्यांची सर्व कामे बांधकाम विभागाला देण्यात आली आहेत. ही सर्व कामे मार्च महिन्यापर्यंत पूर्ण व्हायला हवी होती, परंतु भूमिगत गटार योजनेच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची कामे आणखी लांबणीवर पडली आहेत. जवळपास दोन वर्षांपूर्वी शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाली. हैदराबादच्या शिवास्वाती कंपनीला हे काम देण्यात आले आहे, मात्र या कंपनीच्या वतीने अतिशय कासवगतीने काम सुरू असल्याने केवळ २० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचा परिणाम पंचशताब्दीच्या कामावर झालेला दिसून येत आहे. गेल्या आठवडय़ात महापौर संगीता अमृतकर, आयुक्त प्रकाश बोखड व स्थायी समिती सभापती नंदू नागरकर यांनी बैठक बोलावून शिवास्वातीला १५ जानेवारीपर्यंत पठाणपुरा ते जटपुरा व जटपुरा ते कस्तुरबा चौक या दोन रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या कंपनीचे संचालक शंकर यांनी पालिकेने दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करून देण्याचे पत्रही दिले, मात्र आजवर केवळ डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत काम झाले आहे. ही वस्तुस्थिती बघितली तर १५ जानेवारीपर्यंत काम होणे शक्यच नाही.
बांधकाम विभागाने या कामाचे कंत्राट गजानन कंन्स्ट्रक्शन व गुप्ता कंन्स्ट्रक्शनला दिले आहे. जिल्हाधिकारी विजय वाघमारे व आयुक्त प्रकाश बोखड यांनीही बांधकाम विभागाला रस्त्यांची कामे सुरू करण्यास सांगितले आहे. भूमिगत गटार योजनेची कामेच पूर्ण झाली नाही, तर रस्त्यांची कामे कशी सुरू करायची, असा प्रश्न बांधकाम विभाग व कंत्राटदारांना पडला आहे. शहरात सर्वत्र खोदून ठेवले असल्याने अशा परिस्थितीत कामे करणे कठीण आहे, असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात रामनगर-दाताळा मार्गावर भूमिगत गटार योजनेमुळे संपूर्ण रस्ताच खड्डय़ात गेला. त्यामुळे कंत्राटदाराला भरुदड सहन करावा लागला, तसेच काळय़ा यादीत नाव टाकण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांनीही खोदलेले रस्ते समतोल केल्याशिवाय काम सुरू करण्यास नकार दिला आहे. बांधकाम विभागाने पालिकेला पूर्णत्व प्रमाणपत्र मागितले आहे. एमएसीबीने अजून भूमिगत वीज वाहिनीचे काम सुरू केलेले नाही. या कामाला पंधरा दिवसाचा अवधी लागणार आहे. पालिकेने एमएसीबीला काम सुरू करण्याचे पत्र दिले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यास आणखी तीन चार दिवसाचा अवधी लागणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शहरातील सहा रस्त्यांच्या कामाला बराच विलंब लागणार आहे. रस्त्यांची कामे लांबल्याने शहरवासियांना आणखी काही दिवस धुळीचा व खड्डय़ांचा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.पी.सिंग यांना विचारणा केली असता पठाणपुरा ते गांधी चौक व डॉ.आंबेडकर चौक ते बिनबा गेटपर्यंतचे काम पूर्ण झाल्याचे पालिकेने सांगितले आहे. त्यामुळे या दोन रस्त्यांची कामे लवकरच सुरू करू, अशी माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.