शहरासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सावेडी व केडगाव भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव दिल्लीला जाण्यात मुंबईत मंत्रालयात निर्माण झालेला अडसर दूर झाला आहे. हा प्रस्ताव आता सोमवारी (दि.११) बायहॅण्ड थेट दिल्लीला जाईल. हा अडसर निघण्यात ‘लोकसत्ता’ च्या सर्व आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा उपयोग झाला.
मनपाच्या संबधित अधिकाऱ्याने याची माहिती दिली. या योजनांचे महत्व लक्षात घेऊन नगर मनपाने अत्यंत त्वरेने प्रस्ताव तयार करून त्याला
तांत्रिक मंजुरी घेत, त्याच्यातील सर्व त्रुटी दूर करत तब्बल १८२ कोटी ८२ लाख रूपयांच्या या योजनांचे प्रस्ताव मुंबईत पाठवले. त्यांना राज्य सरकारच्या
संबधित समितीची तसेच नगरविकास मंत्रालयाची अंतीम मंजुरीही मिळाली. त्यानंतर नोडल एजन्सीकडून ते दिल्लीला त्वरीत पाठवले जाणे अपेक्षित होते.
दरम्यानच्या काळात नोडल एजन्सी म्हणून असलेल्या नगरपालिका प्रशासन कार्यालयातील वरिष्ठ पदावर एका अधिकाऱ्याची प्रभारी नियुक्ती झाली. त्यांनी राज्यातील सर्व नगरपालिका, मनपा यांचे प्रस्ताव आल्यानंतर ते एकत्रित दिल्लीत केंद्रीय नगर विकास मंत्रालयात पाठवू असा निर्णय घेतला. दिल्लीत देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्ताव येणार असल्यामुळे तिथे मंजूरीसाठी स्पर्धा होत असते. त्यातून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे तत्व पाळले जाते. त्यामुळे नगर मनपाचे प्रस्ताव दिल्लीत जाणे विनाकारण रखडणार हे निश्चित झाले होते.
‘लोकसत्ता’च्या सर्व आवृत्त्यांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द झा्यानंतर वरिष्ठ राजकीय व प्रशासकीय स्तरावर दखल घेतली गेली व ज्या मनपांचे, नपांचे प्रस्ताव आले आहेत ते तात्काळ दिल्लीत पाठवावेत असा आदेश दिला गेला. नगर मनपाचा प्रस्ताव ‘बायहॅण्ड’ दिल्लीत पाठवून त्याची आता अंमलबजावणी होत आहे. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम स्वत: सोमवारी दिल्लीत केंद्रीय नगर विकास मंत्रालयात हे प्रस्ताव सादर करणार आहेत अशी माहिती मिळाली. तिथून या योजनांना अंतिम मंजुरी मिळाली की नगरकरांचे गेल्या अनेक पिढय़ांचे भुयारी गटार योजनेचे स्वप्न साकार होण्यासाठी पुढे केवळ काही वर्षांचाच अवधी लागणार आहे.