कान्हूरपठारचे सरपंच गोकुळ काकडे यांनी इतर मागास प्रवर्गातून निवडणूक लढवून पावणेपाच वर्षांंचा कालावधी लोटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द ठरवावे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कान्हूरपठार पतसंस्थेचे अध्यक्ष सखाराम ठुबे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कान्हूरपठार ग्रामपंचायतीची सन २००८ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी काकडे नागरिकांच्या मागास प्रवर्गातून बिनविरोध विजयी झाले होते. पुढे ते सरपंचही झाले. राखीव जागेचा उमेदवारी अर्ज सादर करताना निवडणुकीनंतर विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात काकडे यांनी तहसीलदारांना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. बिनविरोध निवड होऊन सरपंचपदावर निवड झाल्यानंतर पावणेपाच वर्षे लोटली तरीही काकडे यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार ठुबे यांनी केली असून यासंदर्भात संबंधित यंत्रणेने त्यांच्यावर कार्यवाहीदेखील केली नसल्याचे नमूद करून याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.