सध्याची दुष्काळी स्थिती विचारात घेता शेतकऱ्यांप्रमाणे परीट (धोबी) व्यावसायिकांनाही शासनाने वीज व कर्जमाफी करावी, अशी मागणी सोलापूर शहर जिल्हा परीट सेवा मंडळ व लॉन्ड्री असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सध्याच्या पाणीटंचाईचा फटका परीट मंडळींना बसत असून त्यामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. शहरी भागात नगरपालिका व महापालिकेने तर ग्रामीण भागात पंचायत समिती तथा ग्रामपंचायतीने परीट मंडळींना धोबी घाट बांधून द्यावेत व नाममात्र दराने पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच दुष्काळ व महागाईमुळे वीजबिल व कर्जमाफी करावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे परीट सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील तात्यासाहेब भालेराव यांचे लॉन्ड्री दुकान विद्युत शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले. त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. भालेराव कुटुंबीय आर्थिक अडचणीतून अद्याप मुक्त झाले नाही. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र सादर केले आहे. त्यानुसार आर्थिक साहय़ मिळावे, अशी मागणी लोंढे यांनी केली. या वेळी लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर माडेकर, प्रकाश भोसले, हरिदास गायकवाड, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.