शहरातील तारांगण प्रकल्प पुन्हा सुरू करावा तसेच झोपडपट्टीतील कुटुंबियांना दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र द्यावे या मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते २८ नोव्हेंबर २००७ रोजी महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून तयार केलेल्या तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन केले. परंतु सुरूवातीच्या काही दिवसानंतर प्रकल्पाला घरघर सुरू झाली. एक ते दीड वर्षांपासून हा प्रकल्प बंद असून तो त्वरित सुरू करण्याची गरज परिषदेने व्यक्त केली आहे. तारांगणाविषयी माहिती शाळा, महाविद्यालय, टीव्ही, रेडिओ यांच्या मार्फत सातत्याने माहिती देत गेल्यास नाशिककरांमध्ये उत्सुकता वाढून तारांगण प्रकल्प व्यवस्थित सुरू राहू शकेल.
तारांगणात ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची महापालिकेने मानधनावर नियुक्ती करावी, याशिवाय झोपडपट्टय़ांमधील कुटुंबियांना दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र द्यावे, ठिकठिकाणी औषध फवारणी करावी, गोल्फ क्लब मैदानाच्या स्वच्छतेचे काम महिला बचत गटाला द्यावे, झोपडपट्टीतील शौचालयाची दुरूस्ती करावी, या मागण्याही परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.