भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्यावरील गोळीबारप्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे व माजी आमदार जयंत ससाणे यांनी केली आहे, तर पतित पावन संघटनेचे जिल्हा संघटक सुनील मुथा व शिवसेनेचे राजेंद्र देवकर यांनी तपास सीआयडीमार्फत कराच असे आव्हान दिले आहे.
गोळीबार प्रकरणी लोकांमध्ये तर्कवितर्क केले जात आहे. घटनेनंतर राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे घटनेची सत्यता तपासून पाहिलीच पाहिजे. लोकांच्या शंकाचे उच्चाटन झाले पाहिजे, त्याकरिता आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी करू असे कांबळे व ससाणे म्हणाले.
शहरात २५ वर्षांपासून जातीय सलोखा आहे. सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. सण-उत्सव एकत्र साजरे करतात. रामनवमी व सय्यदबाबाचा ऊरुस हे त्याचे उदाहरण आहे. पण काही लोकांकडून गावातील वातावरण दूषित केले जाते. गुंडांना कोणताही धर्म व जात नसते, अशा प्रवृत्तीचा बीमोड पोलिसांनी करावा, शहरातील वातावरण गढूळ होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही कांबळे व ससाणे यांनी केली.
गोळीबार प्रकरणाच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नसून पोलिसांचे वागणे हे संशयास्पद आहे. राजकीय दबावामुळे तपास पुढे सरकत नाही. हल्ल्याचा सूत्रधार शोधण्याकरिता तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी मुथा व देवकर यांनी केली आहे.
चित्ते यांनी देशद्रोही कारवायांच्या विरोधात आवाज उठविला, त्याचा राग धरून हल्ला झाला. पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली आहेत त्यामुळे तपास लागू शकणार नाही अशी शंका व्यक्त करुन मुथा व देवकर यांनी तपास सीआयडीकडे सोपवाच त्यातून सत्य बाहेर येईल, असेही पत्रकात नमूद केले आहे.