महाराष्ट्र शासनाच्यावतीने ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्य़ाची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १ मे रोजी या नव्या जिल्ह्य़ाची घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी नुकतेच दिले आहेत. शासनाने पालघर जिल्ह्य़ाच्या निर्मितीबरोबरच गडचिरोली जिल्ह्य़ाचे विभाजन करून अहेरी जिल्ह्य़ाच्या निर्मितीची घोषणा करावी, अशी मागणी नागविदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
राजे अम्ब्रीशराव यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहेरी जिल्ह्य़ाच्या निर्मितीची मागणी गेल्या १० वर्षांपासून करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हा विस्ताराने मोठा असून अद्यापही अविकसित म्हणून गणला जात आहे. नक्षलवादी कारवायांमुळे येथील विकास पूर्णपणे खुंटला आहे. गडचिरोली मुख्यालयापासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या अहेरी परिसरातील विकासाचा कोणताही लवलेश नाही. शासकीय योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यास अधिकारी अयशस्वी ठरत आहे. अहेरी परिसरापासून जिल्हा मुख्यालयाचे अंतर शेकडो किलोमीटर आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाने अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा या तालुक्यांसह कमलापूर, जारावंडी, असरअली, या नव्या तालुक्यांची निर्मिती करून या आठ तालुक्यांसह अहेरी जिल्ह्य़ाची निर्मिती करावी, अशी मागणी राजे अम्ब्रीशराव यांनी केली आहे. जिल्हा निर्मितीसाठी अहेरी परिसरात अनुकूल स्थिती आहे. परिसरात भरपूर वन व खनिज संपत्ती उपलब्ध आहे. अहेरी जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यास या भागाची विकासासोबत येथील आदिवासी बांधवांचा विकास होईल. विकासाचे उद्दिष्ट ठेवून शासनाने ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्य़ाच्या निर्मितीचा निर्णय घेतला असेल तर शासनाने गडचिरोली जिल्ह्य़ाचे विभाजन करून अहेरी या नवीन जिल्ह्य़ाची निर्मितीची घोषणा करावी. अहेरी येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, एस.टी. महामंडळाचे बस आगार, डाकघर, न्याय दंडाधिकारी कार्यालय, प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास महामंडळाचे कार्यालय, शाळा-महाविद्यालये आदी सर्व सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्हा निर्मितीतील कोणतीही अडचण भासणार नाही. कोणत्याही जिल्ह्य़ाची लोकसंख्या वाढली की जिल्ह्य़ायचे विभाजन करण्यात येते. सध्या गडचिरोली जिल्ह्य़ाची लोकसंख्या भरमसाठ वाढली असून जिल्हा मुख्यालयापासून सिरोंचा, भामरागड, असरअली, अंकिसा, एटापल्ली आदी ठिकाणांचे अंतर शेकडो कि.मी. लांब आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली जिल्ह्य़ाचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्ह्य़ाची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.