शिवाजी मंदिरात आज ‘असंही एक साहित्य संमेलन’!
अभिनव कल्पना लढवत नवनवीन उपक्रमांचे आयोजन करणारे नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळे यांनी आता एका आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनाचा घाट घातला आहे. गुरुवारी, ७ मार्चला रात्री आठ वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात अशोक मुळेंचं ‘असंही एक साहित्य संमेलन’ रंगणार आहे. चिपळूण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक उमेदवार आणि ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही उमेदवार अपयशी ठरतात, पण त्यांची स्वतची अशी साहित्यविषयक मते आणि भूमिका असते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ही भूमिका मांडावयाची राहून गेलेले असते. त्यामुळे ही मते आणि भूमिका रसिकांपर्यंत पोहोचत नाही. या संमेलनाच्या माध्यमातून ही भूमिका रसिकांना समजावी अशी या संमेलनामागील संकल्पना आहे, असे मुळे यांनी सांगितले.
 या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद प्रा. प्रतिमा इंगोले भूषविणार आहेत, तर ज्येष्ठ विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीदरम्यान मराठे यांनी केलेल्या काही विधानांमुळे बराच वादंग निर्माण झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी ‘बोला हमो बोला’ या सडेतोड मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे रामदास पाध्ये व अपर्णा पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्या हमोंना बोलतं करणार आहेत. याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवी राजा बढे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘किती गोड गोड’ हा सांगितिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात श्रीरंग भावे, नीलिमा गोखले, अद्वैता लोणकर, जयंत पिंगुळकर आणि बकुळ पंडित हे नवेजुने गायक-गायिका गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन मंजिरी मराठे तर ध्वनिसंयोजन प्रशांत लळीत करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी शिवाजी मंदिरचे विशेष सहकार्य लाभले असून संपूर्ण कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.