राज्याचे नूतन स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांचा सोलापूर शहर जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने स्थानिक वीरशैव लिंगायत समाजाची ‘निर्नायकी’ अवस्था पाहता सोपल यांच्या रूपाने नेतृत्व लाभण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली. मात्र सोपल यांनी राजकीय वाटचालीचे गणित विचारात घेता, वीरशैव लिंगायत समाजाचे नेतृत्व स्वीकारण्याच्या मुद्याला बगल दिली. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सर्व समाज, जाती, धर्माच्या घटकांना सोबत घ्यायचे असते, असे गणित सोपल यांनी मांडले.
एकेकाळी सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या भागात वीरशैव लिंगायत समाजाचे विविध राजकीय, सामाजिक, सहकार, व्यापार, शिक्षण, शेती उद्योग आदी क्षेत्रांत बरेच प्राबल्य होते. अप्पासाहेब काडादी यांच्यापासून ते वि. गु. शिवदारे, बाबूराव चाकोते यांच्यापर्यंत मातब्बर धुरीणांनी समाजाचे नेतृत्व समर्थपणे केले. परंतु त्यांच्या पश्चात या समाजात पर्यायी नेतृत्व उभे राहू शकले नाही. त्यामुळे या समाजाची अवस्था निर्नायकी ठरली आहे. त्यामुळेच अनेक वर्षे अबाधित सत्ता असलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या समाजाच्या ताब्यात निसटली. जिल्हा मध्यवर्ती बँकेतही उपेक्षा सहन करावी लागत आहे. राजकीयदृष्टय़ाही हा समाज मागे पडला.
या पार्श्र्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी योगायोगाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी दिलीप सोपल व उपाध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील या दोन्ही लिंगायत समाजाच्या लोकप्रतिनिधींची निवड माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घडवून आणली होती. त्या वेळी सोपल व पाटील यांचा सत्कार वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने झाला होता. त्या वेळी समाजाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीच्या मुद्यावर मुक्त चर्चा झाली होती. तेव्हा सोपल यांनी नेतृत्वाची जबाबदारी दिवंगत अप्पासाहेब काडादी यांचे नातू तथा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी घ्यावी म्हणून आग्रह केला होता, तर काडादी यांनी उलट, ही जबाबदारी सोपल यांनीच स्वीकारण्याचे आवाहन केले होते. परंतु नंतर आजतागायत समाजाच्या नेतृत्वाचा मुद्दा तसाच प्रलंबित राहिला आहे.
या पार्श्र्वभूमीवर आता दिलीप सोपल हे सोलापूर जिल्हय़ात राष्ट्रवादीअंतर्गत मराठा संघर्षांचा लाभ घेत मंत्री झाले आहेत. तर सोलापूर जिल्हय़ात लिंगायत समाजाला सोपल यांच्या रूपाने प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने समस्त समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातूनच सोपल यांच्या सत्काराची संकल्पना पुढे आली. अर्थात, यानिमित्ताने समाजात नेतृत्वाची असलेली पोकळी सोपल यांच्या माध्यमातून भरून निघण्याविषयी आशावाद व्यक्त झाला.
तथापि, गेल्या ३०-३५ वर्षांच्या राजकारण व समाजकारणात दिलीप सोपल यांची एकटय़ा वीरशैव लिंगायत समाजापुरते नेतृत्व स्वीकारण्याची मानसिकता दिसली नाही. १९८५ पासून बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडून येताना सोपल यांनी लिंगायत व मराठा या प्रमुख घटकांसह इतर सर्वाना सोबत घेण्याचे धोरण अवलंबविल्याचे दिसून येते. त्यांनी स्वत:ची प्रतिमा लिंगायत समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून होऊ दिली नाही. यात पुन्हा सोपल हे मराठी भाषक लिंगायत तर सोलापूरचा वीरशैव लिंगायत समाज हा कन्नड भाषक असल्याचा फरक आहे.

Ichalkaranji
कोल्हापूर : इचलकरंजी पाणी योजनेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, निर्णयावर टीका आणि स्वागत
ichalkaranji hinger strick
सुळकुड बंधाऱ्यावरील महिलांचे उपोषण मागे; दूधगंगा पाणी प्रश्नी मंत्रालयात बैठकीचे आयोजन
Devendra Fadnavis statement on manoj jarange
सरकारने आरक्षण दिले, आता जरांगेंनी अट्टहास सोडावा – देवेंद्र फडणवीस
Jayant Patil son
जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी