सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात मिळावा म्हणून कराड पंचायत समिती सदस्यांचा एक दिवसाचा भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. दयानंद पाटील यांनी मांडलेल्या या ठरावास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
कराड तालुका पंचायत समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व सेवकवर्गाची उपस्थिती होती.
भाऊसाहेब चव्हाण यांनी मसूरच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्यामुळे टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी केली. के. टी. वेअर बंधाऱ्यांना दारे लाऊ नयेत अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली. गटविकास अधिकाऱ्यांनी सद्य:स्थितीत दुष्काळग्रस्त गावांमध्ये पुरेसा पाणीसाठी होत असला तरी भविष्यात टँकरच्या खेपा वाढवण्याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. अजय शिरवाडकर यांनी वैद्यकीय विभागाचा कारभार अतिशय बेजबाबदार असल्याची टीका केली. विंग गावात साथीची बाधा झालेली असतानाही वैद्यकीय विभागाकडून गावातील ग्रामपंचायतीस सुरळीत पाणीपुरवठय़ाचे प्रमाणपत्र दिले जात असल्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. धोंडिराम जाधव यांनी तालुक्यातील हुतात्मा स्मारकांच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकामाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपवण्याची मागणी केली. याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला. रूपाली यादव यांनी विविध कारणांसाठी उकरल्या जाणाऱ्या रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्याची मागणी केली. बांधकाम उपअभियंता आवटे यांनी याबाबत शासनाकडून दुरूस्ती निधी मिळण्यास विलंब होत असल्याचे नमूद केले. तालुक्यातील गोडवाडी गावचे नामांतर ‘पश्चिम उंब्रज’ असे करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.