निवडणुकीचा आखाडा जवळ येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकत्रे भाजपात, तर भाजपाचे कार्यकत्रे राष्ट्रवादीत, अशी ओढाताण सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर लातूर ग्रामीणच्या कार्यकर्त्यांत जोरदार खडाजंगी होऊ लागली आहे. राष्ट्रवादीने भाजपाचे रमेश कराड यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली, तर आपल्यावरील कुभांड राजकीय हेतूने रचल्याचे कराड यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे पदाधिकारी रमेश सुरवसे यांच्या पत्नी वीणा यांनी कराड यांच्या महाविद्यालयात परिचारिका अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली नाही, म्हणून समाजकल्याण आयुक्तांकडे पाठपुरावा केला. आयुक्तांनी प्राचार्याना ताशेरे ओढणारे पत्र दिले. मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करू नये व कागदपत्रे अडवू नये, असे आदेश दिले. विद्यार्थ्यांकडून सव्र्हीस बाँड घेणे बेकायदा असून मूळ कागदपत्रे संस्थेने ठेवून घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही पत्रात बजावले होते.
वीणा सुरवसे यांना रविवारी (दि. २२) पुण्याला मुलाखतीस जायचे असल्यामुळे त्यांनी मूळ कागदपत्रे मागण्यासाठी प्राचार्याकडे निवेदन दिले. मात्र, निवेदन न घेता आपल्याला मारहाण व शिवीगाळ केली, तसेच आपल्याकडील २ हजार रुपये त्यांनी काढून घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे. रमेश कराड यांना अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी. एन. शेळके, बबन भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, मकरंद सावे, मुर्तुजा खान यांनी पत्रकार परिषदेत केली. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, कराड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वीणा सुरवसे यांनी आपल्या महाविद्यालयातून नìसग अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयाच्या प्राचार्याना रमेश सुरवसे अधूनमधून धमकी देत होते व आपल्या नावाने शिवीगाळ करीत होते. दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात येऊन प्राचार्याच्या केबिनमध्ये घुसून त्यांना मारहाण केली, त्यांचा शर्ट फाडला. आपण परगावी होतो. महाविद्यालयात आपल्या कक्षात सर्वाना बोलावून घेऊन समजावून सांगितले व रीतसर पोलिसांना कळवून आपले म्हणणे पोलिसांकडे लेखी दिले. महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांची कागदपत्रासंबंधी अडवणूक केली जात नाही. आपल्या बदनामीचे राष्ट्रवादीने कुभांड रचले आहे.