दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने तालुकानिहाय कक्ष स्थापन केले असुन त्याचा दैनंदिन आढावा घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
स्थायी समितीच्या आज झेलेल्या सभेनंतर लंघे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, सभापती कैलास वाकचौरे, सदस्य सुनिल गडाख यावेळी उपस्थित होते. लंघे म्हणाले, टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरील वीज बिलातील ६७ टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. हा स्वागतार्ह निर्णय घेतानाच प्रादेशिक नळपाणी योजनांचाही त्यात समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. याबाबत राज्या सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवगड येथील पाण्याच्या टाकीच्या निविदेला तसेच शेवगाव तालुक्यातील पाच गावे या योजनेला जोडण्यास स्थायी समितीच्या सभेत आज मंजुरी देण्यात आली. समाजकल्याण विभागाच्या पत्रे व पाईपच्या ४० लाख रूपयांच्या खरेदी निविदेलाही मंजुरी देण्यात आली. अकोले तालुक्यातील देवठाण व नाकविंदे, पाथर्डी तालुक्यातील निंबे नांदूर, शेकटे व आव्हाने खुर्द येथील बंधाऱ्यांच्या निवमिदाही मंजूर करण्यात आल्या. अनेक विभागांची बाराव्या वित्त आयोगातील कामे अजुनही अपुर्ण आहेत, त्याचा तातडीने आढावा घेऊन शक्य तेवढय़ा लवकर ही कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे लंघे यांनी सांगितले.
गडाख यांचा सर्वपक्षीय गौरव
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अर्धविराम, सहवास आणि अंतर्वेध या पुस्ताकांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. याबद्दल त्यांचा दि. ४ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते सर्वपक्षीय सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती लंघे यांनी दिली. गडाख यांच्या या साहित्यिक कार्याचा गौरव करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस असुन जि. प. सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लंघे यांनी केले.