जिल्हा न्यायालयातील मध्यस्थी केंद्राद्वारे १,२१९ प्रकरणे तडजोडीतून सोडवण्यात आली. जिल्हा न्यायालयातील मध्यस्थी केंद्र आणि मध्यस्थी क्लिनिकमध्ये एकूण १,८८५ प्रकरणे दाखल झाली होती. जानेवारी २०१३  ते मे २०१३ या कालावधीत जिल्हा न्यायालयातील मध्यस्थी केंद्रास  पाठवण्यात आलेल्या एकूण १,८८५ प्रकरणांपैकी १,२१९ प्रकरणे मध्यस्थांच्या प्रयत्नांतून तडजोडीने सोडवण्यात आली.
विधि स्वयंसेवक सिद्धार्थ साखरे यांच्या मार्फत पिंकी यांनी पतीच्या विरोधात मध्यस्थी क्लिनिकमध्ये धाव घेतली. त्यांचे पती अजय यांना त्यानुसार नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणात बरेच समुपदेशन झाल्यानंतर तडजोड होऊन लेखी करार करण्यात आला. दुसऱ्या एका प्रकरणात सतीश भोयर यांनी साध्या पत्राद्वारे मध्यस्थी क्लिनिकमध्ये व्यथा मांडली. या प्रकरणातील प्रतिवादी मेसर्स रियलअ‍ॅक पॉलिमर्स यांना बोलवण्यात आले. संबंधित वाद वस्तु खरेदी बाबत १० लाख ४७ हजार ३६४ रुपयांच्या वसुलीबाबतचा होता. मध्यस्थ व्ही.एस. देशपांडे यांच्यामार्फत एकूण पाच मध्यस्थी बैठकी पार पडल्यानंतर दोन लाख रुपये वादीने प्रतिवादीस देण्याचे कबूल केले. त्यामुळे वाद संपुष्टात आला. यावर्षी गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात मध्यस्थी क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.
दावा दाखल पूर्व प्रकरणे पाठवण्याच्या प्रक्रियेस क्लिनिकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण ६५ टक्के प्रकरणांचा या केंद्राद्वारे निपटारा करण्यात आला. या प्रक्रियेमुळे पक्षकारांच्या वेळ व पैशाची बचत होते. पक्षकारांचे वाद सोडवून व भविष्यात दाखल होणाऱ्या संभावित खटल्यांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न असून त्यामुळे समाजात निर्माण होणारी तेढ अशा केंद्रांद्वारे कमी करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी व्यक्त केला.