शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या जिल्हास्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राने विजेतेपद पटकाविले. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानांतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका सुजाता डेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतर्फे खेळाडूंना निधी तसेच स्टेडियममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डेरे यांनी दिले. स्पर्धेत १५ संघांनी सहभाग घेतला. पहिल्या उपांत्य सामन्यात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राने गणेश व्यायाम मंदिरविरुद्ध २५-३, २५-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात वीरेंद्र क्रीडा मंडळाने एनटीपीएस संघावर २५-१३, २५-११ अशी मात केली.
अंतिम सामन्यात वीरेंद्र मंडळावर २५-८, २५-१० असा जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राने विजय मिळविला. अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू राजश्री शिंदे, शिवानी बिडवे, तृप्ती उत्तेकर, प्रणिता बस्ते, स्नेहा घुगे, उत्कर्षां सोनवणे, प्रियंका पगारे यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.