आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील जेहान सर्कल ते गंगापूर या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड करण्याऐवजी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून डांबरीकरण केले तरी भव्य रस्ता उपलब्ध होईल, अशी मागणी नुरानी जामा मस्जिद कब्रस्तान व दर्गा ट्रस्ट यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या साडेचार किलोमीटर रस्त्यावर तब्बल ६४५ झाडे असून ती ऑक्सीजनचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा करणारी असल्याने एकही वृक्ष न तोडता दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.
जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या झाडांमुळे या रस्त्याला शोभा आहे. थेट गंगापूर धरणापर्यंत मोठय़ा प्रमाणावर वस्ती वाढल्याने या रस्त्यावरील रहदारीतही वाढ झाली आहे. वाहनांच्या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी रस्त्याची रूंदी कमी पडत असल्याने या रस्त्यावर अपघातांच्या घटना वारंवार होत असतात. त्यातच कुंभमेळ्यात गर्दीत अधिक भर पडणार असल्याने रस्ता रूंदीकरण आवश्यक झाले आहे. त्यासाठी या रस्त्यावरील वृक्ष तोडण्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यास वृक्षप्रेमींनी हरकत घेतली असून त्यात आता गंगापूर येथील नुरानी जामा मस्जिद कब्रस्तान व दर्गा ट्रस्टची भर पडली आहे.
गंगापूर गावाजवळ कब्रस्तान आहे. कब्रस्तानातील निंब, वड यांसह इतर काही वृक्षांवर तोडण्यासंदर्भातील निशाणी करण्यात आलेली आहे. ही वृक्षतोड करण्यास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. ही जागा सार्वजनिक वापराची असून गंगापूरच्या मस्जिदच्या मालकीची असून तिला ऐतिहासीक महत्व आहे. मुगलांसह छत्रपती शाहू महाराज, पेशवे बाळाजी विश्वनाथ, बाळाजी बाजीराव यांच्या सनदाही या मस्जिदच्या जागेकरीता प्राप्त असून औरंगाबाद येथील महाराष्ट्र वक्फ बोर्डाकाली ‘वक्फ मिळकत’ असल्यासंदर्भातील प्रमाणपत्रही उपलब्ध असल्याचा दावा ट्रस्टने केला आहे. या जागेतील वृक्ष प्राचीन व भव्य स्वरुपाचे असून सध्याच्या रस्त्यापासून फारच दूर आहेत. असे असतानाही या वृक्षांवर निशाणी करण्यात आल्याचे आढळून आले असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. सध्या अस्तित्वात असलेला रस्ता हा संपूर्णत: या कब्रस्तानच्या जागेतूनच गेलेला असून यापुढे आम्ही एक इंचही जागा या रस्त्यासाठी देण्यास तयार नसल्याची भूमिका ट्रस्टने मांडली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोडीव्यतिरिक्त इतर पर्याय योजावेत, असेही त्यांनी सुचविले आहे. या कब्रस्तानमध्ये शहरासह गंगापूरमधील लोक दफनविधीसाठी येत असतात. दफनविधीसाठी ही जागा खूपच कमी पडत असल्याने कबर बांधणे, थडगे उभारणे यास इस्लामी नीतीमूल्यांनुसार आम्ही विरोधी करीत असतो. जेणेकरून दफन विधीसाठी जागा पुरू शकेल, असे ट्रस्टने नमूद केले आहे. या जागेत रस्ता तयार केल्यास दफन विधीसाठी अत्यंत कमी जागा उरणार आहे. त्यामुळे समाजाची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन देऊनही आजपर्यंत या कब्रस्तानास दगडी भिंतीचे कुंपण, छप्पर, पाणी, वीज यांसह इतर कोणत्याही सुविधा न देता उलट कब्रस्तानच्या जागेतून रस्ता बनविण्याकरिता वृक्ष तोडणे म्हणजे आमच्यावर अन्याय केल्यासारखेच होईल, असेही ट्रस्टने म्हटले आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी कब्रस्तानची जागा वगळून इतर पर्याय शोधण्याची मागणी करण्यात आली आहे. कब्रस्तानच्या कुंपणास हात लावू नये तसेच वृक्षांची फांदीही तोडू नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.