महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६० व्या नाटय़महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई विभागातर्फे प्राथमिक नाटय़ स्पर्धा येत्या २० डिसेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
मुंबई विभागात नायगाव, वरळी, अंधेरी गट कार्यालयाची प्राथमिक स्पर्धा ललित कला भवन, जांबोरी मैदान, वरळी येथे होणार आहे. या स्पर्धेत एकूण २३ नाटके सादर होणार आहेत. ठाणे गट कार्यालयातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, कन्नमवार नगर, विक्रोळी येथे २१ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत १८ नाटके सादर होणार आहेत.
 
नवी उमेद जागविणारे पुस्तक
‘बियॉण्ड बॅरिअर्स- दि इनक्रेडिबल इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक माणसाच्या मनात नवी उमेद जागवेल, असा विश्वास विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी नुकताच येथे व्यक्त केला. निशांत खाडे, अरविंद प्रभू, सुनीता संचेती, नीतू सेलवानी या अपंग व्यक्तींनी देशातील २८ राज्ये व ४० प्रमुख शहरांतून फिरून आपले अनुभव, अडचणी, अपंगांना भेडसाविणाऱ्या समस्या या पुस्तकात मांडल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास डॉ. विल्यम टॅन, आमदार सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रेखाचित्रविचार-
एक संवाद पुस्तकाचे प्रकाशन
रणजित होस्कोटे व सुधीर पटवर्धनलिखित ‘रेखाचित्रविचार- एक संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच जहांगीर कला दालनात झालेल्या एका कार्यक्रमात झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी बोलताना डहाके म्हणाले की, कला क्षेत्रातील विकासासाठी महाराष्ट्र चित्रसाक्षर झाला पाहिजे.