दहीपुलावरून मेहेर चौकाकडे येणारा मार्ग आणि गंगापूर रस्त्यावरील केटीएचएम महाविद्यालयासमोरील भागात गुरूवारी धुळीचे साम्राज्य पसरले. ठिकठिकाणी मातीचा सडा पडल्याने या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या परिस्थितीत पाऊस पडल्यास या मार्गावरील वाहतूक वाहनधारकांसाठी धोकादायक ठरू शकते. शहरातील रस्त्यांवर माती सांडवून त्याची स्थिती बिघडविणाऱ्यांविरोधात पालिका काय कारवाई करणार, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाला सुरूवात झाल्यानंतर शहरातील रस्त्यांची कशी चाळणी होते, याचा अनुभव शहरवासीय दरवर्षी घेत असतात. यंदा काही दिवसांपूर्वी कोसळलेला मुसळधार पाऊस वगळता नंतर पुन्हा त्याने दमदार हजेरी लावलेली नाही. यामुळे रस्त्यांची स्थिती काहीअंशी शाबूत राहिली. त्याची कसर माती वाहून नेणाऱ्या मालमोटारींनी भरून काढण्याचे ठरविले असावे. बुधवारी दिवसभर सुस्थितीत असणारा दहीपूल ते महात्मा गांधी रस्त्यावर गुरूवारी सकाळी मातीचा सडा पडला होता. मध्यरात्री या मार्गावरून माती वाहून नेणाऱ्या मालमोटारी मार्गस्थ झाल्यामुळे ही स्थिती ओढावल्याची तक्रार व्यावसायिक व नागरिकांनी केली. मातीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून धुळ डोळ्यात जात असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाऊस पडल्यास हा संपूर्ण रस्ता चिखलमय होण्याची शक्यता असून वाहनधारकांसाठी तो अधिक धोकादायक ठरू शकतो. दहीपुलावरून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारा मार्ग निम्मा डांबरी तर निम्मा सिमेंट कॉक्रीटचा आहे. सिमेंट कॉक्रिटच्या महात्मा गांधी रस्त्यावर पावसाळ्यात अनेक वाहनधारक घसरून पडत असतात. त्यात अनेकांना गंभीर दुखापती झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यात आता मातीची भर पडल्याने भयावह स्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे वाहनधारकांकडून सांगण्यात आले. या सारखीच स्थिती गंगापूर रस्त्यावरील काही भागाची आहे. ‘मविप्र’ शिक्षण संस्थेच्या प्रांगणासमोरील रस्त्याचा भाग असाच मातीमय झाला आहे. या संस्थेच्या आवारात भराव टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ये-जा करणाऱ्या मालमोटारींमुळे ही स्थिती निर्माण झाल्याची तक्रार पोलीस मुख्यालयातील नागरिक व वाहनधारकांनी केली. वाहने गेल्यावर ही माती उडून मागून येणाऱ्या वाहनधारकांच्या डोळ्यात जाते. रस्त्यावर पडलेली माती पाऊस झाल्यास वाहनधारकांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. मातीचा सडा पडल्याने या रस्त्यांची अवस्था बिघडली असून त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.